हर्षल भट, नाशिक
चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव जगभरातच धुमडाक्यात साजरा केला जातो. अनेक भारतीय नागरिक परदेशात गणेशोत्सव साजरा करतात. भारतापासून हजारो मैलांवर असलेल्या मूळच्या आफ्रिकेत राहणारे नागरिक देखील गणेशोत्सव साजरा करतात. पश्चिम आफ्रिकेतील घाना देशात गेल्या ५० वर्षांपासून गणरायाचा उत्सव साजरा होत आहे.
परदेशात गणेशोत्सव साजरा होणे यात नाविन्य नसले तरी आफ्रिकेसारख्या दुर्गम भागात तेथील मूळ आफ्रिकन वंशाचे रहिवासी गणेशोत्सव साजरा करतात यात नक्कीच नाविन्य आहे. १९७० च्या सुमारास आफ्रिकेतील नागरिकांची हिंदू धर्माची वा हिंदुत्वाशी ओळख झाली. आजच्या तारखेपर्यंत आफ्रिकेत सुमारे १२ हजार हिंदू वास्तव्यास असून दरवर्षी तेथे गणेशोत्सव साजरा केला जातो. संस्कृती आणि परंपरेचा उत्तम उदाहरण आफ्रिकन नागरिकांनी जगाला दाखवून दिला आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापासून विसर्जनापर्यंत, सारे भारतीय संस्कृतीप्रमाणे व विधीवत केले जाते.
भारतातील परंपरेप्रमाणे घाना येथील अक्रा देशात ३ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आरती दरम्यान घाना येथील नागरिक शंख वाजवतात तसेच बाप्पाला मोदक व फळे अर्पण करतात. ३ दिवसांच्या विधीवत पूजेत गणपतीच्या आरत्या तसेच ‘गौरी गणेश’, ‘मोरया मोरया’चा जयघोष सर्वजण करतात. संपूर्णपणे सोवळ्यात अन् शंखनाद करून बाप्पाची स्थापना केली जाते. ‘प्रत्येकाने देवावर विश्वास ठेवावा, तोच खरा तारणहार’ असल्याची तेथील भक्तांची भावना आहे. समुद्र सर्वदूर पसरला असल्याने गणपती बाप्पाने येतांना सोबत आणलेला आशीर्वाद सर्वांना मिळावा या हेतूने मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात केले जाते. हजारो मैल दूर असलेल्या आफ्रिकेतील नागरिक ५० वर्षांपासून अखंडपणे बाप्पाची सेवा करत आहेत. परंपरेची अविरत जपणूक करत गणेशोत्सव साजरा करणारा आफ्रिका खंड व तेथील घाना देश एकमेव आहे.