सातपूर प्रभागाची सभा सभापती रविंद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्व खातेप्रमुखांना जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिलेत. तसेच गैरहजर असलेले खातेप्रमुख पुढच्या सभेत उपस्थित राहण्याची सूचना केली. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे तातडीने करावीत असाही सल्ला दिला. दिवाळी सणात रोगराई पसरु नये म्हणून प्रत्येक प्रभागात धूर फवारणी करण्याची मागणी नगरसेवक विलास शिंदे यांनी केली.आगामी महासभा ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन घेण्याची मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी नगरसचिव राजू कुटे यांच्याकडे केली. परिसरात मोकाट जनावरे,मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली.यावेळी दीक्षा लोंढे,सीमा निगळ, मधुकर जाधव,माधुरी बोलकर,हेमलता कंडेकर,डॉ.वर्षा भालेराव,योगेश शेवरे,राधा बेंडकोळी,हर्षदा गायकर, विजय भंदुरे,दशरथ लोखंडे आदींनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या.यावेळी विभागीय अधिकारी नितीन नेर,डी.एस.कोल्हे,नितीन राजपूत, डॉ.रुचिता पावसकर,सुभाष आहेर,शाम वाईकर,माधुरी तांबे,रवींद्र पाटील,एस.एस.कोठुळे आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
ठेकेदाराची देयके देऊ नयेत
विभागात कोरोना बरोबर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून फवारणी होत नसल्याने केवळ ठेकेदाराला पोसलं जातं आहे. वारंवार तक्रार करूनही पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याऐवजी ठेकेदाराची देयके देऊ नयेत असा ठराव सर्वानुमते करावा अशी मागणी सलीम शेख यांनी केली.
दिनकर पाटील बनले प्रति सभापती
सभापती पदाचा रुबाब कायम ठेवत लोकप्रतिनिधींच्या समस्यांना प्राधान्य देत अधिकाऱ्यांवर धाक ठेवणे, अधिकाऱ्यांना शिस्त लावणे या आणि अशा प्रकारचे अनेक धडे नवनिर्वाचित सभापती रवींद्र धिवरे यांना नगरसेवक दिनकर पाटील यांनी दिले. दरम्यान, प्रति सभापती म्हणूनच नगरसेवक दिनकर पाटील यांची भूमिका दिसून आल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती.