याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) याने त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्यासोबत मद्य खरेदी केले. आनंदवली शिवारातील निर्जन इमारतीत दोघेही जाऊन बसले. तेथे मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी भांडण केले. यावेळी संशयित रुपेश याने मनात राग धरुन महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले. गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले. तसेच इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.