नाशिक – आनंदवली शिवारातील मोठा प्रकल्प उभारण्यासाठी भूमाफीयांकडून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकल्पास जमिनी देण्यास विरोध केल्याने ३० लाख रुपयांची रोकड व १० गुंठे जमिनीची सुपारी देवून हत्या करण्यात आल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, बातमी लिक होवू नये, यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संशयीतांनी एकत्रित शपथ घेतल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात एका होमगार्डसह नऊ संशयीतांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन त्र्यंबक मंडलिक (वय ३६), नितीन पोपट खैरे (वय २७), अक्षय ऊर्फ अतुल जयराम मंडलिक (वय २६), भूषण भीमराज मोटकरी (वय ३२), सोमनाथ काशीनाथ मंडलिक (वय ५०), चेहडी शिव, सिन्नर फाटा येथील दत्तात्रय काशीनाथ मंडलिक (वय ४७), पंचवटी येथील आबासाहेब पाराजी भंडागे (वय ४१), भगवान बाळू चांगले (वय २७), पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड येथील बाळासाहेब बारकू कोल्हे (वय ५४), पंचवटी येथील होमगार्ड गणेश भाऊसाहेब काळे (वय २५), वैभव अनिल वराडे (वय २१), ध्रुवनगर येथील सागर शिवाजी ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
चौकशीत विसंगती
१७ फेब्रुवारी रोजी आनंदवली शिवारात रमेश मंडलिक यांचा चाकूने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीनुसार पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत संशयीतांच्या चौकशीत विसंगती आढळून आली.
असे गोळा केले पुरावे
याच काळात पोलीसांनी आनंदवली शिवारातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार,व्यावसायिक, स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. संशयीत भगवान चांगले आणि त्याचा मित्र गणेश काळे याच्या स्वतंत्र चौकशीत खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी हत्यार, गाडी, कपडे, जाळल्याची ठिकाणे महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. परिस्थितीजन्य पुरावा व फियार्दी, मृत रमेश मंडलिक, अटकेतील आरोपींच्या प्रापर्टीबाबत वाद व शास्त्रोक्त तपासाआधारे, पोलीस कोठडीतील आरोपींच्या चौकशी आधारे आरोपी भगवान चांगले याने गणेश काळे याच्या मदतीने मंडलिक यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
खुनाची कबुली
गणेश काळे याने खूनाची कबुली दिली असून न्यायालयाने त्याच्या कोठडीत १ मार्चपर्यंत वाढ केली आहे. गणेश काळे याने रमेश मंडलिक यांचा चाकूने खून केला. त्यावेळी भगवान चांगले इमारतीवरुन गणेशला मंडलिक कोठे आहेत, याबाबत इशारा करीत असल्याचा खुलासा पोलीस उपायुक्तांनी केला आहे.
इतरांचा शोध सुरू
दरम्यान या हत्याकांडात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्यांचा शोध घेतला जात असून लवकरच ते पोलीसांच्या हाती लागतील. भूमाफीयांची दहशत मोडीत काढण्यासाठी संशयीत टोळी विरोधात मोक्का लावण्यात येणार असून जमिन,प्लॉट अथवा फ्लॅट बळकवण्याबाबत काही तक्रारी असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त तांबे यांनी केले आहे.
१५ दिवस पाळत
मृत मंडलिक यांच्या हत्येसाठी संशयीत भगवान चांगले आणि गणेश काळे याने येवल्यापर्यंत पाठलाग केला होता. नातेवाईक सोबत असल्याने त्यांचा चक्कर वाया गेला. गेली पंधरा दिवस ते मृताच्या पाळतीवर होते. शतपावली पासून ते दुध घेण्यासाठी जात असल्याच्या माहितीवरून ते पाठलाग करीत होते.