चंद्रपूर – ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी डॉ. शीतल यांना नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या आत्महत्येचा तपास चंद्रपूर पोलिसांनी सुरू केला आहे. तशी माहिती पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे.
त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. काही दिवसांपासून त्या अस्वस्थ होत्या. ट्विटरवर सात तासांपूर्वी त्यांनी शांतता आणि युद्ध या विषयावरील एक पेंटिंग पोस्ट केले होते. हे पेंटिंग त्यांनी रविवारीच काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात त्यासंबंधीचेच विचार घोळत असल्याचे दिसून येत आहे.
शीतल आमटे सध्या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती.
एप्रिल २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने नवाचार राजदूत म्हणून त्यांची निवड केली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एक्सपर्ट नेटवर्क ऑन ह्युमॅनिटिरिटी रिस्पॉन्स म्हणूनही त्या हातभार लावत होत्या. तसेच त्या ‘SABI’ मध्ये सक्रिय सहभागी होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या पार्श्वभूमीवर शीतल यांच्या आत्महत्येने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
सात तासांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी हे पेंटिंग ट्विटरवर पोस्ट केले. त्याचा विषय होता युद्ध आणि शांतता.