इगतपुरी – आदीवासींच्या न्याय हक्कासाठी ब्रिटीश सरकारच्या जुलूमशाही विरोधात बंड पुकारणाऱ्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे त्यांच्या मुळगावी इगतपुरी तालुक्यातील बाडगीचीमाची, सोनोशी येथे स्मारक व्हावे तसेच परिसराचा देखील विकास व्हावा, असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना घातले.
गुरुवारी ( दि.१० ) मुंबई मंत्रालयात खासदार गोडसे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेवून वरील मागणीचे निवेदन दिले. इगतपुरी तालुक्यात आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक असावे, अशी इच्छा परिसरातील नागरिकांच्या शिष्ठमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेवून व्यक्त केली होती. नागरिकांची मागणीचा विचार करुन खा. गोडसे यांनी गेल्या आठवड्यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार केला होता. गुरुवारी मुंबई मंत्रालयात जावून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेत खा. गोडसे यांनी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासह परिसराच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. याभेटीप्रसंगी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इ. स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी पेशव्यांच्या मदतीने मराठ्यांचा पराभव केल्यानंतर हिंदू महादेव कोळी समाजातील नागरिकांच्या सह्याद्रीच्या किल्ल्यातील परंपरागत शिलेदाऱ्या व वतनदाऱ्या काढून टाकण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांनी शेतसाऱ्यात मोठ्याप्रमाणात वाढ केली होती. त्यामुळे कोळी बांधवांवर आर्थिक संकट कोसळल्यामुळे त्यांच्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढला होता. आदिवासींच्या जमीनी सावकारांच घशात चालल्या होत्या. त्यावेळी आद्यक्रांतीकारक हे सरकारी नोकरीत होते. त्यांनी ब्रिटीशांच्या जुलूमशाही विरोधात बंड पुकारुन आदिवासींच्या न्यायहक्कासाठी आवाज उठविला होता. त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना अटक करीत न्यायालयात वकील देखील का मिळू न देता त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. २ मे १८४८ मध्ये त्यांना ठाणे येथे फाशी देण्यात आली होती. अशा या अद्यक्रांतीकारकाचे त्यांच्या मुळगावी स्मारक असावे, अशी मागणी शहर व परिसरासह संपूर्ण आदिवासींनी नागरिकांनी केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासह परिसरातील विकास कामांसाठी पर्यटन विभागामार्फत निधी मंजुरी मिळावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच चर्चा करुन आदिवासी नागरिकांच्या मागणीची पुर्तता करण्यात येईल, असे अश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले आहे.