नाशिका – आदिवासी विकास विभागाच्या विकासकामांचे दैनंदिन सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयांनी संकेतस्थल व मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे, या अँपद्वारे आश्रमशाळा,वसतिगृहे व विविध विकास योजनांची माहिती संकलित करणे सुलभ होणार आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या मोबाईलमध्ये दैनंदिन फिरती माहिती संकलित करणार आहेत. पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयात या मोबाईल अँपचे उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे. जिल्ह्याती दुर्गमता,वाहतूक व दळणवळण सुविधांचा अपुरा विकास आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता त्यामुळे विकास कार्यावर बऱ्याच मर्यादा येतात. त्यात आदिवासी भागातील आश्रमशाळा,वसतिगृहे आणि विकासकामांचे पर्यवेक्षण,सनियंत्रण,मुल्यमापन करतांना अडचणी येतात. त्यावर प्रभावी उपाय म्हणून नंदुरबार व तळोदा या दोन्ही प्रकल्पांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प कार्यालयाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय अधिकारी यांच्या कामकाजावर संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रणासाठी व सर्व माहितीचे संकलन डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ऑफलाइनही वापरता येणार
तळोदा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, आमि नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून मोबाईल अॅपची निर्मिती झाली आहे. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठविली जाणार आहे. तळोदा प्रकल्पाचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असल्याने मोबाईल अॅप ऑफलाइन स्वरूपातदेखील वापरता येणार असून मोबील नेटवर्क रेंजमध्ये आल्यावर संकलित केलेली माहिती आपोआप संकेतस्थळावर अपलोड होऊन डिजिटल सुरक्षित राहू शकणार आहे. तळोदा व नंदुरबार प्रकल्पांच्या संकेतस्थळांचे व मोबाईल अॅपचे प्रकल्प कार्यालयात दोन दिवसांपुर्वी उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांनी आदिवासी विकास विभाग,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासकामांचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.