नाशिक – सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देण्यात आली आहेत. त्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने पुढाकार घेतला. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पंखात मोठे बळ आले आहे.
फोरमचे प्रमोद गायकवाड यांनी सांगितले की, सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे परिसरात काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे देविदास कामडी यांच्याकडून समजले. पीएसआय परीक्षेची तयारी करत असलेल्या या हुशार विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होत नसल्याचे कळून वाईट वाटले. दोन दिवसांपूर्वीच निफाडचे डॉ. नितीन गीते यांच्या वडिलांची जयंती होती. यानिमित्त त्यांनी कै. जगन्नाथ गीते यांच्या स्मरणार्थ सोशल नेटवर्किंग फोरमला ११ हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीतून त्वरित बाऱ्हे परिसरातील ३५ मुलांना पीएसआय, एमपीएससी प्रवेश परीक्षेची पुस्तके घेऊन देण्यात आली.
फोरमचे समन्वयक विजय भरसट, देविदास कामडी, राकेश दळवी यांच्या उपस्थितीत ही पुस्तके या मुलांना वितरित करण्यात आली. यातील एक मुलगाही पीएसआय झाला तरी गीते कुटुंबीयांच्या या देणगीचे मूल्य सर्वांच्या ध्यानी येऊ शकेल, असे फोरम सदस्यांनी सांगितले. सुविधा तर आम्ही उपलब्ध करून दिली आहे, आता कष्ट करून परीक्षेत यश मिळवण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे, असे दळवी व कामडी यांनी म्हटले आहे.
कौटुंबिक सुख दुःखात वंचित घटकांच्या मदतीच्या हेतूने फोरमसोबत जोडल्या गेलेल्या डॉ. नितीन गीते आणि त्यांना फोरमचा परिचय करून देणाऱ्या डॉ. उत्तमराव फरताळे यांचे फोरमच्या सर्व सदस्यांनी आभार मानले आहेत.
आदिवासी भागातील विद्यार्थी संधीवाचून वंचित राहणार नाही यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन फोरमने केले आहे.