नाशिक – आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थीनींना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिप्लोमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदिवासी विकास विभाग व नवगुरूकुल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येथील नवगुरुकुल प्रशिक्षण केंद्रात निवासी प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थिनींनी अर्ज दाखल करावे, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, आदिवासी विकास मंत्री ॲड के. सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील आदिवासी विद्यार्थीनीना सॉफ्टवेअर इंजिनियरिंग डिप्लोमा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्र हे या पुढील काळात महत्त्वपूर्ण क्षेत्र असणार आहे. त्यामुळे या काळाची चाहूल ओळखून आदिवासी मुली तसेच महिला यांना तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आदिवासी विभागाचा हा प्रयत्न अत्यंत स्तुस्त्य आहे.
या प्रशिक्षणासाठी चार टप्प्यात चाळणी परीक्षा होणार असून यातील पहिला टप्पा म्हणजे विद्यार्थिनींची गणित विषयाची चाचणी परीक्षा ही प्रकल्प स्तरावर घेण्यात येणार आहे. यानंतर यातील पुढील सर्व टप्पे हे फोनवरील मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहेत. फोनवर होणाऱ्या तीन मुलाखतीत अनुक्रमे इंग्रजी संभाषण कौशल्य, बीजगणित आणि विद्यार्थ्याची अभिवृत्ती व कौटुंबिक परिस्थिती याबद्दल माहिती घेतली जाणार आहे. या सर्व चाळणी परीक्षेतून किमान 100 विद्यार्थीनींची निवड विभागामार्फत होईल. यानंतर निवड झालेल्या विद्यार्थीनीचे निवासी प्रशिक्षण डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत कोंढवा येथील प्रशिक्षण केंद्रात पूर्ण होणार आहे. हे सर्व प्रशिक्षण मोफत स्वरुपात असणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थिनी देखील स्वत: व्यावसायिक शिक्षण पूर्ण करतील ही सुखद बाब आहे.
सदर परिक्षेसाठी आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकातील वय वर्षे 17 ते 25 यातील आदिवासी मुली आणि महिला यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी कमीतकमी 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच 12 वी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थींनी सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात, असे शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने या मुली सक्षम होतील. तसेच कोरोना महामारीच्या काळात अनेक कामे तंत्रज्ञानामुळे सहज आणि सुलभ केली. रोजगाराच्या दृष्टीने भविष्यात तंत्रज्ञान हे एक मोठे आकाश असणार आहे. आमच्या आदिवासी विद्यार्थिनी नक्कीच हे क्षेत्र गाजवून आपल्या भावा-बहिणींना देखील अनेकोत्तम संधी आणतील, असाही विश्वास आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.