नाशिक – आदिवासी दिनानिमित्त विविध ठिकाणी बहुविध उपक्रम झाले. पण गणोरा गावाने घेतलेला पुढाकार वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
गणोरा गावातील तरूण, नोकरदार वर्ग, बच्चे कंपनी, ज्येष्ठ नागरिक, शाळेतील शिक्षक, पाहुणे मंडळी यांनी “जागतिक आदिवासी दिन” निमित्त एकजूट दाखविली. हे सर्व जण गावाच्या मुख्य रस्त्यावर जमले आणि त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यालगत तसेच परिसरात वृलागवड केली. आदिवासी बांधव हे निसर्गपूजक आहेत. म्हणूनच हा उपक्रम राबविल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील युवा मित्रांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गावातील नोकरदार वर्गाने गावाच्या या हरितक्रांतीसाठी सढळ हाताने आर्थिक मदत करत निधी जमवला.
गावातील शिक्षक, मान्यवर व जबाबदार गांवकरी यांनी गावातील तरूणांना सोबत घेत वृक्षारोपण यशस्वी केले. पहिल्या टप्प्यात लागवड संपन्न झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात या झाडांचे संगोपन केले जाणार आहे. त्यासाठी तातडीने वृक्षसंवर्धन समिती नेमण्यात आली आहे. विविध जणांवर जबाबदारी देण्यात आली असून येत्या १५ ऑगस्टलाही वृक्षलागवड केली जाणार आहे. त्या दिवशीही अशाच प्रकारे सर्व जण उत्स्फुर्तपणे येणार आहेत.