आदिवासी वारली चित्रसंस्कृती संवादी आहे. साध्यासोप्या आकारातून नेमक्या भावभावना व्यक्त करण्याचे विलक्षण सामर्थ्य या कलेत आहे. त्याचाच प्रभावीपणे उपयोग जनजागृती करण्यासाठी वारंवार करण्यात येतो.पूर्वी सरकारी पातळीवर एचआयव्ही एड्स बाबत वारली चित्रांमधून प्रबोधन करण्यात आले. आत्ताच्या कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारली कलाकारांनी योगदान दिलेले दिसते. डहाणू तालुक्यातील अनिल वांगड हे युवा वारली चित्रकार पद्मश्री जिव्या मशे यांचे शिष्य आहेत. त्यांनी तसेच गुजरातमधील तुलसीभाई पटेल या शिक्षकांनी वारली कलेचा सुंदर वापर करून समकालीन व समयोचित जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.
महाराष्ट्राची वारली चित्रशैली सर्वत्र सुपरिचित झाली आहे. केवळ कलेच्या पातळीवर न राहता ही आदिवासी कला सुशिक्षित समाजाच्या प्रबोधनात योगदान देते.गडद गेरू रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगातील ही आकर्षक चित्रे बघणाऱ्याशी सहजपणे संवाद साधतात.११०० वर्षांची समृद्ध परंपरा या चित्रसृष्टीला लाभली आहे. साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य या आदिवासी कलेत दिसते. अनिल वांगड हा संवेदनशील युवा वारली चित्रकार ! त्याला आईकडून कलेचा वारसा व जमातीकडून प्रेरणा मिळाली. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या कलमीपाड्याजवळ राहणाऱ्या अनिलला बालपणापासून त्यांचे जवळून मार्गदर्शन लाभले. वारली चित्रांचे विषय सामान्यतः दैनंदिन जीवन, परिसरातील निसर्ग, पर्यावरण, शेती,सण – उत्सव, लग्नसमारंभ,आनंदाचे प्रसंग हेच असतात. अलीकडे वारल्यांचे जीवन विस्तारले आहे. शहरात आल्यावर दिसणारी नागरी जीवनातील प्रतिके वारली चित्रात ठळकपणे येतात. देशोदेशी फिरलेल्या जिव्या मशेंंचे क्षितिज रुंदावले.त्याचा प्रत्यय त्यांच्या चित्रांमधून येतो. शहरापासून दूर पाड्यावर रहाणाऱ्या अनिलने मशेंंच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक देशांत आपल्या वारली चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. कोरोना महामारीने तो देखिल व्यथित झाला. प्रसारमाध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याने चित्रातून कोरोनावर भाष्य केले. या समकालीन भीषण संकटाविषयी जनजागृती करण्यात तो यशस्वी झाला आहे.
६२ इंच लांब व ५२ इंच उंचीच्या कॅनव्हासवर अनिलने प्रभावी चित्रण केले आहे. कोरोना संकटाची चाहूल लागल्यापासूनचे वातावरण त्यात दिसते. २२ मार्च ते
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे तपशील अनिलने वारली चित्रशैलीत सांकेतिक पध्दतीने मांडले आहेत. त्यात तो सहजपणे भाष्य करतो. हात धुणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर राखणे, शरीराची स्वच्छता पाळणे, सकस आहार घेणे या गोष्टी दुर्गम जंगलात राहून आम्ही पिढ्यानपिढ्या करीत आहोत. त्यामुळेच या महामारीपासून आम्ही बचावलो. आता सारे जग या गोष्टींचा अवलंब करतेय. जुने ते सोने या म्हणीचा अशावेळी प्रत्यय येतो.असे त्याचे म्हणणे आहे. पूर्वीची साधीसोपी जगण्याची पध्दत चांगली होती हे सगळ्यांना या महामारीने पटवलेय.म्हणजे आपण चक्राकार फिरत आहोत याकडे कलाकाराने लक्ष वेधले आहे. कोविडचा जागतिक परिणाम प्रतिकात्मक पध्दतीने सुंदर चित्रित केला आहे. जगातल्या महत्वाच्या शहरातील प्रसिद्ध वास्तू अनिलने सहजपणे रेखाटल्या आहेत. पॅरिसचे आयफेल टॉवर, इटलीतील पिसाचा झुकता मनोरा तसेच विमाने, रेल्वे, जहाजे ही वाहने रेखाटून मानवी स्थलांतर, जागतिक आदानप्रदान व वैश्विक संकटाची भीषणता त्याने स्पष्ट केली आहे. त्याचवेळी भारतात चिनी ड्रॅगनच्या रुपात झालेला कोविडचा प्रवेश दाखवला आहे. या जीवघेण्या विषाणूचा आकार सूक्ष्म असला तरी होणारा फैलाव विषाणूंच्या रांगेतून मांडला आहे.
मंदिर, मशीद,चर्च रेखाटून कोविडचा विषाणू धर्मभेद,पंथभेद,जातीभेद पाळत नाही याकडे अनिलने लक्ष वेधले आहे. सर्वांनी नियम पाळून बंधुभावाने जगावे असा संदेश त्याने ठळकपणे दिलेला दिसतो. चित्राच्या मध्यभागी लॉकडाऊनचे प्रतिक म्हणून मोठे कुलूप रेखाटले आहे. त्याकाळात कोणालाच कोरोनाविषयी फारशी माहिती नव्हती. सरकारपासून सगळेच चाचपडत होते.त्यासाठी प्रश्नचिन्ह दाखवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार साबणाने हात धुणे हे उपाय सुचवले होते. त्यांचे काटेकोरपणे पालन करणे हाच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पर्याय होता. त्याचे नेमके चित्रण केलेले दिसते.हताशपणे दोन व्यक्ती कपाळाला हात लावून बसलेल्या दाखवल्या आहेत. त्यातून सर्वसामान्य माणसांची मानसिकता सूचित केली आहे. हे बोलके चित्रण संकटाची भीषणता व्यक्त करते. दुसऱ्या भागात जगभरात सुरू असलेले लशीबाबतचे संशोधन, अनलॉकनंतर पूर्वपदावर येणारे जनजीवन रंगवलेले दिसते. अभ्यासू वृत्तीचे चित्रकार अनिल वांगड पारंपरिक पध्दतीने वारली चित्र रेखाटतात. त्यासाठी ते कायमच आग्रही असतात. शेणाने कुडाची भिंत सारवून त्यावर गेरूने रंगलेपन करतात. या गडद पार्श्वभूमीवर वारली चित्र रेखाटण्यासाठी पांढऱ्या रंगाऐवजी तांदळाच्या पिठाचाच ते आवर्जून वापर करतात. त्यामुळेच त्यांची चित्रे अधिक भावतात.
गुजरातमध्ये तापी जिल्ह्यातील पाठकवाडी गावातील एका शिक्षकाने आपल्या घराच्या भिंती वारली चित्रांनी सजविल्या आहेत. तुलसीभाई पटेल यांनी कोरोनाचे संकट आल्यावर गावातील लोकांचे चित्रांद्वारे प्रबोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आदिवासी वारली कलेचा आधार घेतला. चारी बाजूंच्या बाहेरील भिंती त्यांनी शेण, लाल माती, झाडांच्या साली, वाळलेले गवत, लाकडाचा भुस्सा यांच्या मिश्रणाने लिंपून काढल्या. सुकल्यावर गेरूने रंगीत पार्श्वभूमी तयार केली. चुन्यात डिंक मिसळून पांढराशुभ्र रंग बनवून चित्रे रेखाटली आहेत. कोविड महामारीत समाजासाठी अनेकजण शर्थीचे प्रयत्न करीत होते. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, शिक्षक, सफाई कर्मचारी या साऱ्यांंनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. त्यामुळेच असंख्य नागरिक बचावले. या कोविड योध्यांंना त्यांनी चित्रे रेखाटून सलाम केला आहे.या कामात त्यांची पत्नी प्रीतिबेन पटेल यांनी खूप मदत केली. त्यांच्या या उपक्रमाचा सर्वत्र खूपच बोलबाला झाला. निरक्षर लोकांमध्ये जनजागृती होण्यास फार मोठी मदत झाली. ही चित्रे बघण्यासाठी गावातले तसेच आजूबाजूच्या गावांमधील लोक आले व जाताना जनजागृतीचा संदेश घेऊन गेले. ही केवळ दोन प्रातिनिधीक उदाहरणे झाली. अनेक कलाकारांनी वेळोवेळी समकालीन चित्रणातून समाज प्रबोधन केले आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा वारली चित्रशैलीने सामाजिक बांधिलकी निभावली आहे. सामाजिक चळवळीत ठोस भूमिका बजावली असल्याचा इतिहास आहे.
सर्वस्पर्शी वारली चित्रशैली!
संपूर्ण वर्षभर चाललेल्या या माझ्या लेखमालेत आदिवासी वारली चित्रशैलीचे विविध पैलू उलगडले.या कलेच्या संशोधनासाठी भरपूर भ्रमंती केली. कोरोनामुळे त्यात अडथळा आला. पण त्यापूर्वी ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पाड्यांवर फिरलो आहे. जव्हार, मोखाडा, डहाणू ,तलासरी, खानवेल, दुधनी,सिल्व्हासा या भागात अनेक वारली कलाकारांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत चित्ररेखाटने केली. पद्मश्री जिव्या मशे यांचे सखोल मार्गदर्शन मिळाले. सर्वस्पर्शी वारली कलेबरोबरच त्यांची संस्कृती, जीवनशैली यांचा अभ्यास झाला.डॉ. गोविंद गारे यांनी वारलीकडे बघण्याची दृष्टी दिली. नवनवीन माहिती सामोरी येत गेली. त्यावर लिहीत गेलो. वारली कलेतील कथाचित्रे, स्त्रीशक्तीची अभिव्यक्ती, देखण्या तारपानृत्याचे बहारदार चित्रण, अल्पशिक्षित वारल्यांचे अगाध भौमितिक ज्ञान, धवलेरीची कला, लग्नचौक – सुरेख कलात्मक आविष्कार, समृद्धीचे प्रतिक – मोर, साधीसोपी जीवनशैली, आदिम कलेचे पितामह – जिव्या मशे, आदिवासींच्या अस्मितेचे प्रतिक, जगायला जातो, वारली चित्रांनी गणेश सजावट, भास्कर कुलकर्णी – लोकचित्रशैलींंचा तारणहार, भातसंस्कृतीची कला, पशुपक्षी आमचे सखेसोबती, सांकेतिक चित्रभाषा, रंग माझा वेगळा, जव्हारचा शाही दसरा – तारपा स्पर्धा, वारली चित्रशैलीचा मूळ प्रेरणास्त्रोत, आनंदयात्री ही लेखांची शीर्षके विषय स्पष्ट करतात. गेल्या रविवारी ‘ मी वारली चित्रशैली बोलतेय…’ हे आदिवासी कलेचे आत्मकथन लिहिले. या मालिकेत सुमारे ४० लेख प्रकाशित झाले.त्यांना वाचकांचा सदैव भरघोस प्रतिसाद मिळाला. दर रविवारी अनेकांचे फोन येतात.ध्यासपूर्वक संशोधन ही न संपणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे हे काम पुढेही सुरूच राहील. अनेक विषय मनात आहेत. या मालिकेत ५१ लेख पूर्ण करण्याचा संकल्प आहे. नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा ! पुढील वर्षात पुन्हा भेटूया नव्या लेखासह !!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!