आदिम कलेद्वारे लोकप्रबोधन!
—
कोरोनाच्या संकटाने उच्चांक गाठला असून भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित देश ठरला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनासह विविध स्तरातून जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या चित्रस्पर्धेत आदिम कलेद्वारे प्रभावी लोकप्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्रातली आदिवासी वारली चित्रशैली अत्यंत बोलकी असून शब्दांपलीकडचा संवाद त्याद्वारे साधता येतो. हे वारंवार सिद्ध झाले आहे.पुन्हा एकदा चित्रस्पर्धेने ते अधोरेखित केले.
      कोरोनावर जोपर्यंत परिणामकारक लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत काही पथ्ये पाळूनच त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाने काही नियम आखून दिले आहेत. प्रत्येकाने त्यांचे काटेकोर पालन करून कोरोनापासून सुरक्षित राहता येते. वारंवार साबणाने हात धुणे,घराबाहेर सातत्याने मास्क वापरणे, सॅनिटायझरने हात व हाताळलेल्या वस्तू स्वच्छ करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, गर्दी करण्याचे टाळणे व सार्वजनिक स्वच्छता ठेवणे यांचा अवलंब केलाच पाहिजे. हे सगळे संदेश वारली चित्रांमधून प्रभावीपणे देता येतात हे सहभागी स्पर्धकांनी दाखवून दिले. अहमदनगरच्या लायनेस क्लब प्रांत ३२३४ डी २ तर्फे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कोणत्याही भारतीय आदिवासी कलेद्वारे कोरोना नियंत्रण, निर्मूलनाबाबत चित्रातून प्रबोधनाचे आवाहन करण्यात आले. भारतीय
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ही ऑनलाईन चित्रस्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्तपणे भरघोस प्रतिसाद मिळाला.नुकताच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. खुल्या गटात माझ्या विद्यर्थिनींनी सर्व पारितोषिके पटकावली. रोहिणी बिचवे,ऍड.अपूर्वा भंडारे,बीना केळकर, विद्या शुक्ल, सोनाली केळकर यांनी अनुक्रमे यश मिळवले. स्पर्धेच्या संयोजिका व प्रांताध्यक्षा साधना पाटील व सहकारी कविता पटेकर, रेखा येणारे,तेजश्री भामरे, वैशाली वाणी व प्रकल्प प्रमुख नीलम परदेशी यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

    मुळातच चित्रकला ही जागतिक भाषा आहे. कोणत्याही भाषेतील मुळाक्षरे शिकण्याआधी प्रत्येकाला चित्रांच्या आधारे शब्दांची ओळख होते. चित्रकला हे विविध भावभावना रंगरेषेद्वारे व्यक्त करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. म्हणूनच चित्रकलेच्या माध्यमातून अभिव्यक्ती करता येते. चित्रकला अगदी प्रागैतिहासिक काळापासून आदिमानवाला  अवगत होती. त्याचे पुरावे व नमुने अस्तित्वात आहेत. भारतात भीमबेटका, फ्रान्समध्ये लास्को, स्पेनमधील अल्टामीरा येथे अतिप्राचीन गुहा आहेत.त्यातील भिंतींवर मानवाचा पहिला कलात्मक आविष्कार आढळतो. तेथे शिकारीची दृश्ये रेखाटलेली असून हजारो मैलांवरील या चित्रांमध्ये विलक्षण साम्ये देखील आढळतात. महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीलाही ११०० वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. अबोल वारली जमातीच्या महिलांनी दहाव्या शतकात झोपडीच्या भिंतींवर प्रथम चित्रे रेखाटली. गडद रंगाच्या भिंती तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र रंगाने सजवल्या. त्याचक्षणी वारली चित्रशैलीचा उगम झाला. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडणाऱ्या विविध घटनांना वारली कलाकार चित्ररूप देतात. साध्यासुध्या प्रसंगांना आकार देऊन बोलके केले जाते. भौमितिक मुलाकारांचा कल्पक वापर करून माणूस, प्राणी, पक्षी, सभोवतालचा निसर्ग, पर्यावरण रेखाटण्यात येते. रचनेचे, मांडणीचे सौंदर्य हे वारली चित्रशैलीचे वैशिष्ट्य आहे. चित्तवेधकता हा विशेष गुण या कलेत आढळतो. त्यामुळेच वारली चित्रे बघणाऱ्या रसिकांशी सहजतेने संवाद साधतात. रंगाचा अभाव असला तरी रेषा, आकारातून बोलतात.
     वारली कलेच्या या सामर्थ्याचा उपयोग यापूर्वीही मोठया प्रमाणावर झाला आहे. एचआयव्ही एड्सविषयी प्रबोधनात्मक मोहीम शासनाच्या आरोग्य विभागाने राबवली तेव्हा वारली चित्रे वापरण्यात आली होती. कोकाकोला, सनफीस्ट मारी बिस्कीट यांच्या जाहिरातीत वारली चित्रांनी महत्वाची भूमिका बजावली. अशी अनेक उदाहरणे आहेत. निसर्ग आणि पर्यावरणावर आधारीत जीवनशैली आदिवासी वारली जमातीने अंगिकारली आहे. त्यामुळेच शाश्वत जीवनाचा, शांती – समाधानाचा मार्ग त्यांना गवसला आहे. दुर्गम पाड्यांवर रहाणारी ही वारली जमात साधेसुधे जीवन आनंदाने जगते. कमीतकमी गरजा हे त्यांचे जीवनमूल्य आहे. कशाचाही हव्यास नसल्याने ते समाधानी असतात. हीच शिकवण कोरोनाच्या काळात आपल्याला, शहरी नागरिकांना मिळाली आहे. आदिवासी पाडे आजही कोरोनामुक्त आहेत. मोठी शहरे मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. चित्रस्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी या साऱ्यांचा विचार करून चित्रे रेखाटली. कोरोनाच्या संकटातून आपला व आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे चित्रातून मांडण्यात आले. तसेच कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे हे देखील सांगण्यात आले.
       प्रथम पारितोषिक विजेत्या रोहिणी बिचवे यांनी राम आणि लक्ष्मण धनुष्यबाणाद्वारे कोरोनाच्या विषाणूचा वेध घेताना दाखवले आहेत. वृद्धांची काळजी घ्या,गरम पाणी प्या, वाफ घ्या असेही चित्रातून सांगितले आहे. द्वितीय पारितोषिक विजेत्या ऍड.अपूर्वा भंडारे यांनी मध्यभागी पृथ्वी रंगवून गो कोरोना गो असा संदेश दिला. चित्रातील मानवी आकार अतिशय बोलके रेखाटल्याने चित्र प्रभावी झाले. तृतीय पारितोषिकाच्या मानकरी बीना केळकर यांनी घरी रहा – सुरक्षित रहा तसेच आपण आपली काळजी घेऊया व कोरोनाला हरवूया हे चित्राद्वारे स्पष्ट केले. विद्या शुक्ल आणि सोनाली केळकर यांनीही प्रभावी वारली चित्रे रेखाटून प्रबोधन केले. मध्यंतरी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पोस्टर स्पर्धा घेतली. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या उद्याच्या डॉक्टरांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. दीपक वर्मा आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्यासमवेत करण्याची संधी मला मिळाली. काही स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पोस्टर्स सादर केली. मात्र काहींनी पोस्टर ऐवजी चक्क हँडबील्स केली तर काहींनी स्वतःचे कलाकौशल्य वापरण्याऐवजी डिजिटल मदत घेतली.त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाद ठरवावे लागले. पोस्टरमध्ये परिणामकारक चित्राला, आकर्षक रंगसंगतीला प्राधान्य असते. त्याच्या जोडीला मोजक्या शब्दात ठळकपणे शीर्षक व उपशीर्षक अभिप्रेत असते. तरच त्या पोस्टरमधून योग्य संदेश बघणाऱ्याच्या मनावर ठसतो. पोस्टर हे लोकसंपर्काचे महत्वाचे माध्यम मानले जाते.
प्रोत्साहन अन् प्रेरणा
कोणत्याही स्पर्धा किंवा उपक्रमांमधील सहभागासाठी प्रोत्साहनाची आवश्यकता असते. नाशिक, परिसरातील स्पर्धक महिला कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम मेघा पिंपळे यांनी केले. त्या देवळाली – नाशिकरोड लायनेस क्लबच्या अध्यक्षा आहेत. जून महिन्यातच त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे महिलांसाठी चित्रस्पर्धा आयोजित केल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी ती माझ्यापर्यंत पोहोचवली. त्यातून स्पर्धेला नाशिकसह राज्यातील विविध भागातून प्रतिसाद मिळाला व उपक्रम यशस्वी झाला. सामाजिक कार्याची मनापासून आवड असणाऱ्या मेघा यांनी यापूर्वी अनेकांच्या सहकार्याने कोरोना योध्यांंचे बळ वाढवले. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत घरोघरच्या महिलांना तंत्रस्नेही बनवले. काळाची गरज बनलेले तंत्रज्ञान आत्मसात करून अनेक गृहिणींंनी आपापले कलाकौशल्य सादर केले.नाशिकरोडच्या शिखरेवाडीतील स्वयंसिद्धा महिलामंडळ तसेच ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनमध्ये त्या विविध पदांवर कार्यरत आहेत. लायनेस क्लबतर्फे नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श गुरुजनांना सन्मानित करण्यात आले. लवकरच येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आकर्षक स्पर्धा, उपक्रम आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. नेतृत्वगुणा बरोबरच उत्तम सूत्रसंचालक म्हणूनही मेघा पिंपळे यांचा नावलौकिक आहे.
(संजय देवधर. मो. ९४२२२७२७५५)

			








