नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठी स्टील कंपन्यांपैकी एक असलेल्या मित्तल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आदित्य मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य हे प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मी निवास मित्तल यांचा पुत्र असून ते सध्या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आहेत.
या कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीची स्थापना करणारे लक्ष्मी मित्तल सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आता ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असतील आणि आदित्य मित्तल हे कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
या निवेदनात म्हटले पुढे आहे की, कार्यकारी अध्यक्षपदी असलेले लक्ष्मी मित्तल हे संचालक मंडळाचे नेतृत्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापन पथकाशी समन्वयाचे काम करत राहतील.
दरम्यान,आदित्य मित्तल यांनी या प्रसंगी सांगितले की, जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यांच्या वडिलांनी इंडोशियातील रोलिंग मिलमधून स्टील क्षेत्रात जगातील आघाडीची कंपनी म्हणून आर्सेलर मित्तलची स्थापना केली. लक्ष्मी मित्तल म्हणाले की, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आदित्य मित्तल एक योग्य उमेदवार असल्याचे मंडळाने एकमताने मान्य केले.