मनाली देवरे
….
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने जाता जाता किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९ गडी राखून पराभव केला तर दुस–या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स वर मात केली. या दोन्ही विजयानंतर प्ले ऑफचे संघ कोणतेॽ याचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही झाले नाही. यंदा प्रथमच आयपीएलच्या इतिहासात अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यन्त हा प्रश्न गुलदस्त्यात रहाणार आहे.
चेन्नई संघाला सलग तिसरा विजय बघायला मिळाला असला तरी त्यांच्यासाठी या सञातला हा शेवटचा सामना होता. आधी किंग्ज इलेव्हन पंजाबला १५३ धावात रोखण्याची किमया करणे आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करून विजय मिळवणे अशी दुहेरी कामगिरी या तळाच्या संघाने पार पाडली. चेन्नईला विजयाचा हा सुर थोडा आधी गवसला असता तर आता कदाचित वेगळे चिञ बघायला मिळाले असते. लुंगी एंगीडीने घेतलेले ३ महत्वपुर्ण बळी आणि त्यांनतर फलंदाजीत सातत्य दाखवणा–या ॠतुराज गायकवाडच्या ६२ धावांना फाफ डुप्लेसीस (४८) आणि अंबाती रायडुची (३०) मिळालेली मजबुत साथ, यामुळे चेन्नईचा विजय सोपा ठरला.
दुस–या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करतांना १९१ धावांचे भले मोठे लक्ष्य राजस्थान रॉयल्सला दिले होते. शुभमन गिल (३६), राहुल ञिपाठी (३९) आणि इयान मॉर्गन (६८) यांनी या सामन्यात धावांचा प्रवाह आटू दिला नाही. कर्णधार इयान मॉर्गन सातत्याने जबाबदारी ओळखून खेळतो आहे. आज त्याच्या ६८ धावा ३५ चेंडूत आल्या हे विशेष. या डावात यंदाच्या आयपीएलची वेगळी ओळख असलेल्या “राहुल” फॅक्टरचा बोलबाला होता. राहुल तेवतियाने ३ बळी मिळवले. पॅट कमिन्सने आज केकेआरसाठी पैसा वसूल गोलंदाजी केली.
साखळीत उरल्या अवघ्या दोन लढती.
आता आयपीएलमध्ये साखळी सामन्यातला अवघ्या दोन लढती उरल्या आहेत. त्यापैकी सोमवारी दिल्ली कॅपीटल्स विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही लढत होणार असून मंगळवारी मुंबई इंडीयन्स विरूध्द सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना होईल. हे दोन्ही सामने अत्यंत महत्वाचे आहेत कारण आयपीएलचे पहिले चार संघ या सामन्यांच्या निकालानंतरच निश्चीत होणार आहेत.