नाशिक – महावितरणच्या नाशिक मंडलाअंतर्गत असलेल्या नाशिक शहर विभाग १ या कार्यालयाचे स्थानांतरण द्वारका चौकातून नाशिकच्या बिटको चौकातील विद्युत भवन आवारातील स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत करण्यात आले आहे. बुधवार ११ रोजी महावितरणच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली .यावेळी अधिक्षक अभियंता प्रविण दरोली आणि संजय खंडारे हे सुद्धा समवेत उपस्थित होते.
हे कार्यालय यापूर्वी द्वारका चौक परिसरातील खरबंदा पार्क, बिल्डिंगमध्ये कार्यरत होते. मात्र ती जागा वापर करण्यास अपुरी पडत असल्याने व वाहन पार्किंग समस्येचा त्रास होत होता. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार महावितरणने भाडेतत्वावर असलेली कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याची कार्यवाही सुरु केली आहे. भेटीवेळी मान्यवरांचे स्वागत नाशिक शहर विभाग १ चे कार्यकारी अभियंता धनंजय दीक्षित यांनी पुस्तके देऊन केले. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) महेश बुरंगे, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (विवले) राजा बोढारे, समवेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या विद्युत भवन परिसरात परिसरात महावितरणची परिमंडळ, मंडळ, पायाभूत आराखडा, नाशिक ग्रामीण विभाग, ग्राहक तक्रार निवारण मंच, ग्राहक सुविधा केंद्र यासह इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने ग्राहकांना सुविधा व सहजता होणार आहे. तरी वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.