मुंबई – मतदार ओळखपत्रांना बेकायदेशीर नक्कल होण्यापासून वाचवण्यासाठी आणि अतिरिक्त सेक्युरिटी अपडेट म्हणून निवडणूक आयोग लवकरच मतदार ओळखपत्रांना डिजिटल स्वरूप देणार आहे. निवडणून आयोगाने येत्या २५ जानेवारी पर्यंत डिजिटल वोटर आयडी आणण्याची पुरेपूर तयारी केलेली आहे. ज्या दिवशी हे नवीन ओळखपत्र लोकार्पण केले जाईल, त्या दिवसाला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरे केले जाईल.
डिजिटल स्वरुपात ओळखपत्र उपलब्ध झाले तरीदेखील ते घ्यायचे किंवा नाही हे मतदारांनी ठरवायचे आहे. म्हणजेच ही योजना वैकल्पिक आहे. मात्र जे मतदार याचा लाभ घेतील त्यांना आपले डिजिटल मतदान ओळखपत्र सरकारच्या डीजीलॉकर सुविधेअंतर्गत ऑनलाईन स्टोरेज मध्ये सेव्ह करून ठेवता येणे शक्य होईल. याबाबत बोलताना एका जाणकार व्यक्तीने सांगितले की मतदान ओळखपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया आपल्याकडे खूप किचकट आणि वेळखाऊ असते. आता मात्र तुमचा अर्ज मंजूर झाल्याबरोबर लगेच तुमचे इलेक्टर्स फोटो आईडी कार्ड इश्यू करण्यात येईल आणि त्याला डाऊनलोड करणेही शक्य असेल. या कार्डची प्रिंट घ्यायची असेल तर तीसुद्धा ग्राह्य धरली जाईल. शिवाय, डिजिटल स्टोरेज मध्ये याचा उपयोग करता येईल.
सामान्य माध्यमातून मतदार ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरु राहील. आधीच मतदान ओळखपत्र असलेल्या मतदारांना डिजिटल स्वरूपात कार्ड हवे असेल तर आयोगाच्या बेवसाईटवर किंवा मोबाईल अप्लिकेशन वर अर्ज करावा लागेल. आपल्या मोबाईल नंबर वरून सत्यापन झाल्यानंतर डिजिटल स्वरूपातील कार्ड आपल्याला सेव्ह किंवा डाउनलोड करून प्रिंट करता येईल.
डिजिटल वोटर कार्ड मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने २ क्यूआर कोड असतील. पहिल्या कोड मध्ये व्यक्तिचा फोटो आणि जनसांख्यिकीय माहिती असेल, तर दुसऱ्या कोड मध्ये निवडणुकीच्या निमित्ताने दिला जाणारा डायनेमिक डेटा असेल. जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा हा दुसरा क्युआर कोड आपोआप अपडेट होईल आणि त्यात मतदानाची तारीख आणि वेळ समजू शकेल. म्हणजेच मतदाना आधी वोटर स्लीप वितरणाच्या कामातून आयोगाची सुटका होईल.