पुणे – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यात सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन आजपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार आगामी सात दिवस पुण्यातील मॉल, थिएटर, पीएमपीएल बससेवा, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट हे सर्व बंद राहणार आहे. तर, अन्नाची होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे.
खासगी कंपन्या सुरू राहणार असून त्यांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांना परवानगी असणार आहे. सायंकाळी ६ ते पहाटे ६ या वेळेत ही संचारबंदी असणार आहे. शनिवार (३ एप्रिल) सायंकाळी ६ वाजेपासून ही संचारबंदी सुरू होणार आहे. विभागीय महसूल आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, संचारबंदी संपल्यानंतर पुढील शुक्रवारी पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
लग्न, अंत्यविधी यासारखे कार्यक्रम सोडून सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसेल. वाईन शॉप हे सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहेत. बार आणि रेस्टॉरंट मात्र बंद राहणार आहेत. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात तब्बल ८ हजार रुग्ण जवळपास दररोज आढळून येत आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.