-
शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते औपचारिक प्रसारण
-
संगीतकार सचिन पगारे, विजयराज निकम यांनी प्रतिज्ञा केली संगीतबद्ध
मुंबई – क्रांतीदिनाचे औचित्य साधून तमाम हुतात्म्यांना अभिवादन करुन भारत माझा देश आहे, या संगीतमय राष्ट्रीय प्रतिज्ञेचे औपचारिक प्रसारण राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी संगणकाची कळ दाबून करणेत आले.
नाशिक येथील रुख्मिनी प्रॉडक्शन, स्पंदन मीडिया, डी फॅशन व सोनवणे फौंडेशन यांनी एकत्रीत हा नवा प्रयत्न केला आहे. संगीतकार सचिन पगारे, विजयराज निकम यांनी ही प्रतिज्ञा संगीतबद्ध केली आहे.
याप्रसंगी ना. गायकवाड यांनी महाराष्ट्रात भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा संगीतमय केल्याने ती निश्चितच सर्वतोमुखी होईल, असे गौरवोद्गार काढून संगीतकार व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. कलाकारांच्यावतीने संगीतकार सचिन पगारे, विजयराज निकम व गायक जीतू देवरे यांनी स्वागत केले.
या संगीतमय राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या व्हिडिओत महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. यात प्रामुख्याने प्रिया बेर्डे, माया जाधव, दीपाली सय्यद, मनीषा चव्हाण, भाग्यश्री शिंदे, मेघा घाडगे, प्रांजल सुरवाडकर, शुभांगी सदावर्ते, मिलिंद शिंदे, कांचन पगारे, जयवंत वाडकर, सुनील गोडबोले, सचिन घावडे, योगेश शिरसाट, करणं वाघमारे तसेच स्थानिक कलाकारांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध गायिका उत्तराताई केळकर, गायक विजयराज निकम, जीतू देवरे, सुप्रिया देवरे इत्यादींनी प्रतिज्ञा सुमुधुर आवाजात गायली आहे.
याप्रसंगी नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती राहुल केदारे, प्रा. प्रतिभा बिश्वास, विलासराज गायकवाड, धवल आढाव, प्रवीण गांगुर्डे, राजेश वाघमारे प्रा. राजू गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.