नवी दिल्ली – फायझर आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंतर आता हैदराबादच्या भारत बायोटेक या औषध कंपनीनेही कोविड -१९ वरील कोव्हॅक्सिन या लसीसाठी आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. या कंपनीने केंद्रीय औषध नियामकात यासाठी अर्ज केला आहे. अशाप्रकारे ही लस वापरण्याची परवानगी घेणारी ही तिसरी कंपनी बनली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने कोव्हॅक्सिन लसीचा विकास भारत बायोटेक कंपनी करीत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड -१९ ही लस काही आठवड्यांत तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी अमेरिकन औषधनिर्माण संस्था फायझरच्या भारतीय शाखेने आपल्या लसीच्या तातडीच्या वापरासाठी केंद्रीय औषध नियामकांकडून मंजुरी मागितली. यापूर्वी या कंपनीला यूके आणि बहरेनमध्ये अशी मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, ऑक्सफोर्डकडून कोविड -१९ लस कोविशिल्टसाठी दि. ६ डिसेंबर रोजी सीरम संस्थेने यासंदर्भात मान्यता मागितली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) मधील कोविड -१९ वरील विषय तज्ज्ञ समिती येत्या काही दिवसांत भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि फायझर यांच्या अर्जांवर विचार करेल. तसेच अद्याप यापैकी कोणताही अर्ज समितीला पाठविला गेलेला नाही आणि समिती अर्जांच्या मूल्यांकनासाठी कधी बैठक घेईल याची तारीख निश्चित केलेली नाही.