मुंबई – राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड येथे पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त श्री.तुंबाड, पशुसंवर्धन विभागाचे सह सचिव माणिक गुट्टे उपस्थित होते.
पशुसंवर्धन मंत्री श्री.केदार म्हणाले, राज्यात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागांचे अनेक भूखंड आहेत. त्यावर पशुसंवर्धन विभागाचे अनेक वर्षापुर्वीचे बांधकाम असलेले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तसेच इमारतीच्या परिसरात रिकाम्या जागा आहेत. त्या जागेचा विकास बीओटीतत्वाने करण्यात येणार आहे. रिकाम्या जागेत अतिक्रमणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता या जागेवर सुसज्ज इमारती बांधून त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने, कार्यालये आणि अधिकारी-कर्मचारी यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. प्रथम प्रायोगिक तत्त्वावर नाशिक, अहमदनगर आणि बीड या ठिकाणी हे राबविण्यात येणार असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस एक्सिनो कँपीटल सर्विस प्रा.लि.चे अध्यक्ष आर विश्वनाथ अय्यर, काझीसंघाणी गृप आँफ कंपनीचे संचालक समीर काझी या विकासकांनी विकास करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले.