नाशिक – महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यानंतर आता पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय हे सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी ८० बाधित हे नाशिक शहरातील आहेत. यासंदर्भात मुख्य सचिवांनी नाशिक प्रशासनाला खडसावल्यानंतर महापालिका आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरुन कारवाई सुरू केली. आता पोलिस आयुक्त पाण्डेय हे सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत.
आयुक्तांनी आज भद्रकाली, दुध बाजार आणि जुने नाशिक परिसराचा दौरा केला. नागरिकांनी मास्क घातलेला आहे की नाही, याची शहानिशा केली. ९० टक्के नागरिकांनी मास्क घातल्याचे आढळून आले. तर, ज्यांच्याकडे मास्क नव्हते त्यांना आयुक्त पाण्डेय यांनी मास्क दिले. तसेच, अशा व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी थेट केंद्रात नेण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या दौऱ्यात पाच व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळली असून त्यांनी मास्क घातलेला नव्हता. या व्यक्ती सुपर स्प्रेडर असल्याच्या संशयाने त्यांना पोलिस वाहनातून थेट कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे.