नवी दिल्ली – ट्विटर हे एक लोकप्रिय समाजमाध्यम आहे. किमान शब्दात येथे कमाल आशय लिहिता येतो. या ट्विटरच्या स्पर्धेत आता एक स्वदेशी ऍप आले आहे, टूटर. चायनीज ऍप्सवर बंदी घातल्याने स्वदेशी ऍप्सचा सध्या बोलबाला आहे. आता टूटरही याच स्पर्धेत उतरले आहे.
सध्या याचे केवळ अँड्रॉइड व्हर्जन लाँच करण्यात आले असून मेड इन इंडिया असलेले हे ऍप अनेक मान्यवर वापरताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टूटरवर अकाउंट असून त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होतो आहे. सकृतदर्शनी हे ऍप ट्विटरसारखेच असले तरी याचे वेगळेपण त्याच्या लोगोमध्ये आहे. याचा लोगो आहे शंखाचा.
हे ऍप यंदा जून – जुलैमध्ये लाँच करण्यात आले. गुगल प्ले स्टोअरवर हे ऍप आहे. सध्या याचे केवळ अँड्रॉइड व्हर्जन असून आयओएस व्हर्जन येणे बाकी आहे. यावर करण्यात येणाऱ्या पोस्ट्सना टूट्स असे म्हटले जाते. भारताकडे स्वतःचे स्वदेशी सोशल नेटवर्किंग असायला हवे असे आम्ही मानतो. त्यासाठीच हे ऍप सुरु करण्यात आल्याचे या वेबसाईटवर म्हटले आहे.
यांचेही आहेत अकाऊंट
ऑगस्टमध्ये पंतप्रधानांनी यावर अकाऊंट उघडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही यावर अकाऊंट उघडले आहे. अभिनेता अभिषेक बच्चन, भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली आणि माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी यांनीदेखील इथे अकाऊंट उघडले असून ते व्हेरिफाय करण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, हे अकाऊंट या लोकांनी बनवले आहेत की नाही.