पुणे – १४ मार्च रोजी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यात परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता नव्याने २१ मार्च ही तारीख परिक्षेसाठी लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.
या परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असतांना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले व त्यांनी गुरुवारी जोरदार आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. आता १४ मार्च रोजी होणारी परीक्षा २१ मार्चला होणार आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे आयोगाने म्हटले होते. त्यामुळे ही परीक्षा रद्द केली होती. पण, आता नवीन तारीख जाहीर केली आहे.
याआधी ही परीक्षा एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती. पण, तेव्हाही कोरोना व लॅाकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतापले होते. पण, आता नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे त्यांचा संतापही कमी झाला आहे.