नवी दिल्ली – चक्रीवादळ ‘निवार’चा धोका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘एनसीएमसी’ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीमध्ये तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेश यांचे मुख्य सचिव आणि विविध मंत्रालयांचे सचिव सहभागी झाले होते.
या चक्रीवादळामुळे जीवितहानी होऊ नये त्याचबरोबर मालमत्तेचे कमीतकमी नुकसान सुनिश्चित करणे, आमचे उद्दिष्ट आहे. तसेच वादळग्रस्त भागामध्ये जनजीवन पूर्ववत करण्यासाठी वीजपुरवठा, दूरसंचार संपर्क यंत्रणा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रामध्ये शक्य तितक्या कमी वेळात काम करण्यात येईल.
या वादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्यांनी केलेल्या सज्जतेची माहिती यावेळी राज्यांच्या मुख्य सचिवांनी ‘एनसीएमसी’ला दिली. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक यांनी निवार वादळाच्या सद्यस्थितीची माहिती यावेळी दिली. तसोच आगामी तीन दिवसांमध्ये कशाप्रकारे सिद्धता करण्याची आवश्यकता आहे, याची कल्पनाही दिली. त्यानुसार एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 30 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आवश्यकता भासल्यास अतिरिक्त 20 तुकड्या तामिळनाडू ,पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशात सज्ज आहेत.
मच्छिमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीच्या भागातल्या नागरिकांनाही सुरक्षित स्थानी हलविण्यात येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांनी केंद्राकडून राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.