मनाली देवरे, नाशिक
……
रविवारी चेन्नई सुपर किंग्ज या तळाच्या संघाने मजबुत रॉयल चॅलेजंर्स बंगलोर संघाचा ८ गडी राखुन मोठा विजय मिळविला तर दुस–या सामन्यात यंदाच्या आयपीएलची “टॉपर” असलेली मुंबई इंडीयन्स राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाली. अगदीच तळाला असलेल्या या दोन्ही संघानी रविवारी विजय मिळविल्यानंतर आता सगळी आयपीएल ढवळून निघाली असून आता पुढे काय ॽ तर उर्वरीत सामन्यात १०० टक्के “काटे की टक्कर” अशा वळणावर २०२० ची आयपीएल स्पर्धा येवून थांबली आहे.
चेन्नईचा विजय
चेन्नई सुपर किंग्जने, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव करून स्वतःसाठी फार काही साध्य केले नसले तरी आरसीबी संघाला २ गुणांचा तोटा करून त्यांना माञ चांगलेच अडचणीत आणले आहे. चेन्नईच्या आशा या विजयाने जिवीत ठेवलेल्या असल्या तरी या सर्व आशाआंकाक्षा अद्याप व्हेंटीलेटरवरच आहेत. आरसीबीने प्रथम फलंदाजी करतांना केवळ १४५ धावा केल्या. त्यात विराट कोहलीची अर्धशतकी खेळी फलंदाजीचा कणा ठरली. संपुर्ण चेन्नईचा संघ एकीकडे आणि सॅम करण एकीकडे असे चिञ यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा दिसून आले आहे. या सामन्यात अष्टपैलू करणची गोलंदाजी चेन्नईसाठी तारणहार ठरली. त्याने ३ षटकात १९ धावा देवून ३ महत्वपुर्ण बळी घेतल्याने आरसीबीला मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही. धावांचा पाठलाग करतांना या सामन्यात चेन्नईचे सगळे धुरंदर फंलदाज या सिझनमध्ये जे करू शकले नाही ते नवख्या ॠतुराज गायकवाडने करून दाखविले. ५१ चेंडूत नाबाद ६५ धावा करून गायकवाडने चेन्नईचा विजय सोप्पा केला.
मुंबई इंडीयन्स पराभूत
मुंबई इंडीयन्सचा राजस्थान रॉयल्सविरूध्दचा सामना देखील आज चांगलाच रंगला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा–या मुंबईचे १९५ धावांचे एक तगडे आव्हान राजस्थान संघाला दिले होते. मुंबईची अवस्था १५ षटकापर्यन्त अतिशय वाईट होती. २० षटकात १५० च्या आसपास धावा होतील असे वाटत असतांनाच फलंदाजीला आलेल्या हार्दीक पांडयाने दिवाळी पुर्वीच आतषबाजी सुरू केली. अवघ्या २१ चेंडूत ६० धावा बदडतांना त्याने ७ षटकार आणि २ चौकार मारले. तो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरल्यानंतर राजस्थान रॉयल्सने नेहमीप्रमाणे हे आव्हान पेलण्यासाठी कंबर कसली खरी, परंतु यावेळची राजस्थानची रणनिती प्रत्यक्षात उतरली. बेन स्ट़ोक आणि संजु सॅमसन या जोडीने २ बाद ४४ या धावसंख्येवरून राजस्थानला थेट विजयासाठी आवश्यक असलेल्या धावसंख्येवर नेवून ठेवले. रॉबीन उथप्पाची विकेट मिळवणे यंदाच्या आयपीएलमध्ये आता फार काही कठीण राहीलेले नाही. त्याच्याबरोबर कर्णधार स्टीव्ह स्मिथ हे पॅटीन्सनचे बळी ठरल्यानंतर माञ बेन स्ट़ोक आणि संजु सॅमसन या दोघांनी विजयासाठी आवश्यक असलेली भागीदारी रचली आणि १६ गुणांची कमाई करून विजयादशमीचा शुभमुहूर्तावर या सिझनच्या प्ले ऑफमध्ये पहिला प्रवेश मिळविण्यासाठीचे मुंबई इंडीयन्सचे प्रयत्न हाणून पाडले.
सोमवारची लढत
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब हा साखळीतला अतिशय महत्वाचा सामना शारजामध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांचे गुण सारखे असल्याने आणि दोन्ही संघांसाठी आता “करो वा मरो” अशी स्थिती निर्माण झाल्याने सामना रंगतदार होईल यात कोणतीच शंका नाही.