नवी दिल्ली – कोरोनावरील लस देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत १० देशातील लोकांना ही लस देण्यात आली आहे. हे १० देश आहेत, अमेरिका, चीन, ब्रिटन, कॅनडा, रशिया, बहारीन, चिली, कोस्टारिका, मेक्सिको आणि इस्राएल. तर इतर देश अजूनही लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वर्षात ती मिळण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेऊया आतापर्यंत कितीजणांना ही लस मिळाली आहे.
तुम्हाला हे माहीत आहेच की, एका व्यक्तीला कोरोना लसीचे २ डोस दिले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात किती लोकांना हे डोस दिले आहेत, हे कळणे शक्य नाही. पण किती डोस दिले आहेत हे कळू शकतं. अवरवर्ल्डइनडाटा या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४८.३ लाख डोस देण्यात आले आहेत. यात सर्वाधिक डोस अमेरिकेत देण्यात आले असून, त्याची संख्या १९.४ लाख आहे. त्यानंतर चीन (१० लाख), ब्रिटन (८ लाख), रशिया (७ लाख), इस्राएल (२.७९ लाख), बहारीन (५१ हजार ५५६), कॅनडा (४३ हजार ५२५), चिली (८ हजार ३२४), मेक्सिको (२ हजार २९४) तर कोस्टारिका येथे ५५ जणांना डोस देण्यात आला आहे.
हे डोस घेण्यात देश म्हणून अमेरिका आघाडीवर असली तरी प्रति १०० व्यक्ती लस देण्याचा विचार केला तर इस्राएलमधील नागरिक लस घेण्यात आघाडीवर आहेत. येथे १०० लोकांमागे लस घेण्याचे प्रमाण ३.२३ टक्के एवढे आहे. त्याखालोखाल बहरिन आणि मग ब्रिटनचा नंबर लागतो.