नाशिक : साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी इच्छुकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय येथे १० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी इ. दहावी, बारावी, पदवी व वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात मागील वर्षी ६० टक्केहुन अधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुणवत्तेनुसार आणि उपलब्ध निधीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करतांना अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, फोटो आणि पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र इत्यादी दोन प्रतीत जोडावे. तसेच अर्ज १० ऑगस्ट पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नासर्डीपुलाजवळ नाशिक रोड, नाशिक या पत्त्यावर अर्ज करावेत. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही श्री. आरणे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.