मुंबई – सोनी टीव्हीवरील लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या यंदाच्या १२व्या सीझनमधील पहिला वाहिला करोडपती मिळाला आहे. झारखंडची राजधानी रांची येथील नाजिया नसीम असे त्यांचे नाव आहे. एक करोड रुपयांसाठी नाजिया यांना विचारण्यात आलेला प्रश्न हा मनोरंजन क्षेत्रातील होता असे समजते. ऑक्टोबर महिन्यात चित्रित झालेला हा भाग १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे.
नाजिया यांना वाचणे, कविता करणे यासोबतच वर्तमानपत्र आणि जनरल नॉलेजची पुस्तके वाचून स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची आवड आहे. त्यांची हीच आवड लक्षात घेऊन नाजिया यांनी केबीसी मध्ये सहभागी व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. आईचे हे स्वप्न लक्षात घेऊन त्यांनी यात भाग घेण्याचे ठरवले. आणि तब्बल १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्या यात यशस्वी झाल्या.
नाजिया यांचे माहेर डोरंडा येथील असून सासर छत्तीसगड येथे आहे. सध्या त्या पती आणि मुलासमवेत दिल्लीत राहतात. त्यांच्या पतीची दिल्लीतच जाहिरात कंपनी आहे. तर स्वतः नाजिया या गुडगांव येथील रॉयल एन्फिल्ड कंपनीत ग्रुप मॅनेजर म्हणून काम करतात.
एक करोडचा प्रश्न काय होता या प्रश्नावर केबीसीच्या नियमांमुळे आपण हे सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण हा प्रश्न मनोरंजन क्षेत्रातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातत्याने स्वतःला अपडेट ठेवण्याची सवय आणि तीव्र स्मरणशक्ती यांमुळे मी ही स्पर्धा जिंकले असल्याचे त्या सांगतात.
एक करोड रुपये जिंकण्यापेक्षाही आपण आईचे स्वप्न पूर्ण केले याचा आनंद असल्याचे नाजिया सांगतात. या पैशांचा वापर कसा करायचा हे काही अजून ठरलेलं नाही. पण या विजयामुळे माझ्या आईला जो काही मानसन्मान मिळतो आहे, त्यामुळे मी खूप खूष आहे, असे त्या म्हणाल्या.