मुंबई – महाराष्ट्र पोलिस दलातील आणखी २४४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासातील या आकड्यांमुळे कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांविषयी अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १८ हजार २१६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १४ हजार ४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३ हजार ५७६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत १८४ पोलिस कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे.
एक कोटी देण्याची मागणी
“कोरोना महामारीमुळे राज्यातील आरोग्यविषयक सोयी सुविधांचा बोजवारा उडालाच आहे त्याचबरोबर ही परिस्थिती राज्य सरकारच्या हाताबाहेर जात असल्याचे दिसते आहे. अशाही स्थितीत आपले मनोबल कायम राखत अविरतपणे काम करणाऱ्या पोलीस दलाचा आम्हास अभिमानच वाटतो आहे. जोखीम पत्करून काम करणाऱ्या पोलिसांचा योग्य सन्मान करणे गरजेचे आहे. मृत्यूमुळे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले असताना त्यांना दिल्लीतील केजरीवाल सरकार प्रमाणे किमान १ कोटीची मदत महाराष्ट्र सरकारने द्यायला हवी,” अशी मागणी आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.