नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केली आहे. दिल्लीतील खासदार निवास्थानी एका फ्लॅटमध्ये शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकले नाही. शर्मा ६२ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या जोगिंदरनगरचे ते रहिवासी होते.
दिल्लीतील आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या गोमती अपार्टमेंटमध्ये रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना सकाळी साडेआठला मिळाली. पोलिस अधिकारी पोहोचले तेव्हा त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
बुधवारी सकाळी त्यांचा कर्मचारी खोली उघडण्यास गेला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा आवाज देऊनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. पोलिसांना पाचारण केल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला.
शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपची बुधवारची संसदीय दलाची बैठक रद्द केली आहे. त्यांनी सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. खासदार होण्यापूर्वी ते भाजपचे जिल्हा सचिव होते, त्यानंतर हिमाचल प्रदेश भाजप सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1372073088968364032