चेन्नई – गेल्या महिन्यात काही दिवसांपूर्वी तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे चक्रीवादळ वादळाने मुसळधार पावसासह मोठी हानी झाली. आता पुन्हा आणखी एका चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टीवर धडकून दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये २ ते ३ डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होत असून दि. २ डिसेंबरला संध्याकाळ किंवा रात्री श्रीलंकेच्या उत्तर किनारपट्टीवरुन हे वादळ सीमा ओलांडून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी तामिळनाडूमधील कन्याकुमारीजवळील कोमोरिन प्रदेशात त्याचा प्रभाव दिसून येईल. हवामानशास्त्र
विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, या चक्रीवादळच्या परिणामामुळे तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशातील काही भागात दि. २ ते ३ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून
दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दबाव विभाग तयार झाला आहे. तो पश्चिम-वायव्येकडे पसरला असून येत्या १२ तासांत एका कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये त्याचे रुपांतर होईल. त्यानंतर येत्या २४ तासात त्याचे चक्रीवादळाच्या वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. कोमोरीन प्रदेश, मन्नारचा आखात आणि दक्षिण तामिळनाडू-केरळ येथे दि २ डिसेंबरच्या पूर्वेकडून जोरदार वारे वाहू लागतील आणि समुद्र अशांत राहील त्यामुळे त्याच्या प्रभावाखाली येणाऱ्या सर्व भागात या काळात मासेमारीचे काम थांबवण्याचा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.