नाशिक – नाशिकच्या वाहतुकीमध्ये सुधारणा व्हावी, नाशिकमधील अपघात कमी व्हावेत व नाशिक सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील आदर्श शहर ठरावे व इतर शहरांसाठी ते अनुकरणीय ठरावे यासाठी नाशिक फर्स्ट सातत्याने प्रयत्नशील आहे. रस्ता सुरक्षा साप्ताहाचे निमित्ताने नाशिक फर्स्ट दर वर्षी रस्ता सुरक्षेविषयी नवनविन संकल्पना राबवित असते. याही वर्षी नाशिक फर्स्ट असाच एक नाविण्यपुर्ण उपक्रम करीत आहे.
वाहतूक या विषयावर नाशिक फर्स्ट गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने अभ्यास करून सुरक्षित वाहतूक व अपघातमुक्त नाशिक यासाठी झटत आहे. नाशिक फर्स्ट ने नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई नाक्याजवळ भारतातील सर्वात सुंदर व सुनियोजित असे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क साकारले आहे. तेथे रोज आम्ही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, प्रौढ, रिक्षा चालक, बस चालक आणि विविध संस्थांच्या कर्मचार्यांसाठी व शहरातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण मोफत देत आहोत. अशा कार्यशाळांमधून आजतागायत नाशिक फर्स्ट ने २,६७० हून अधिक सत्रांतुन १,३८,००० च्या पेक्षा जास्त लोकांना रस्ता वाहतुक सुरक्षेचे प्रशिक्षण दिले आहे. की ज्यामुळे नाशिकमधील रस्ते अपघात कमी होण्यास मदत होत आहे. नाशिक फर्स्ट चे धोरण हे समाजाची नि:शुल्क सेवा करणे हे आहे. या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत देखील आम्ही हे आव्हान लक्षात घेऊन झुम प्लॅटफॉर्मवरील ई-लर्निंग सिस्टमद्वारे प्रशिक्षण सत्रांची सुरूवात केली आहे.
बरेच नागरिक देखील या प्रशिक्षणासाठी सतत चौकशी करीत असतात, परंतु याआधी हे प्रशिक्षण ग्रुपशिवाय घेता येत नव्हते, अशा नागरिकांसाठी खास रस्ता सुरक्षा साप्ताहाचे निमित्त साधून ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांना हे प्रशिक्षण हवे आहे त्यांनी www.nashikfirst.com या वेबसाईटवर जावून आता एकट्याचे देखील बुकिंग करु शकतात. हे प्रशिक्षण आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सायंकाळी ४ वा. देण्यात येईल. तरी सर्वांनी आपली नोंदणी करुन लवकरात लवकर या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक फर्स्ट चे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी केले आहे.