पंडित दिनेश पंत
आज व उद्या (२९ व ३० नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत आहे. याच दिवसाला कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी चातुर्मास सांगता, दामोदर माह सांगता अशा विविध नावांनी विविध प्रदेशात ओळखले जाते.
त्रिपुरारी पौर्णिमेची कथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते – चातुर्मासादरम्यान भगवान विष्णू यांनी विश्वाचे सूत्र सांभाळण्याचे कार्य भगवान शिव म्हणजे शंकराकडे सोपवले होते. परंतु याच काळात ब्रह्मदेवाचे वरदान असलेला त्रिपुरासूर राक्षस याने देवतांना सळो की पळो करून सोडले. त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी शिव आराधना केली. त्यामुळे भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. त्याचा आनंदोत्सव म्हणून सर्व देवांनी दिवे व पणत्या लावून आनंद साजरा केला. याला देव दिवाळी म्हणतात.
या दिवशी कापसापासून सूत काढून त्याच्या बोटाच्या पेरा इतक्या सहस्र वाती एकसंघ बांधूनही त्रिपुर वात भगवान शिवमंदिरात प्रज्वलित केली जाते. याच दिवशी भगवान शंकरांचे पुत्र कार्तिक स्वामी भगवान कार्तिकेय यांची जयंती साजरी केली जाते.
चातुर्मास समाप्ती देखील त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या सप्ताहात सुरू असलेल्या तुलसी विवाहाची सांगता देखील त्रिपुरारी पौर्णिमेला होते. यंदाही पौर्णिमा २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४७ पासून ३० नोव्हेंबर दुपारी ०२:५९ पर्यंत आहे. या पौर्णिमेला गंगा स्नान तसेच दीपदान याचे अधिक महत्त्व असते.
चातुर्मासादरम्यान सागरामध्ये शेषशाही अवतारात असलेल्या विष्णू यांनी आजच्या दिवशी परत विश्वाची सूत्रे भगवान शंकराकडून स्वीकारताना झालेली हरी व हराची भेट म्हणून आजच्या दिवशी कृष्ण मंदिरात तुळस तर शिवमंदिरात बेल वाहनाला अधिक महत्त्व आहे.
याच दिवशी पुष्कर येथील सरोवरात ब्रह्मदेवाने स्नान केल्याने देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. भगवान विष्णूने याच दिवशी मत्स्यावतार घेतल्याचे सांगितले जाते. अशा रीतीने ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तिन्ही मुख्य देवतांच्या उपासनेचा हा महत्त्वाचा दिवस आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला केलेला उपवास हा चातुर्मासाचे फळ देतो, असे मानले जाते.