नवी दिल्ली – मोदी सरकारने पारित केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्याविरोधात २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली घेराव हे देशभरातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे आंदोलन दिल्ली येथे होत आहे. राष्ट्रीय किसान महासंघ व अखिल भारतीय किसान समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किसान मोर्चा या फोरमची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती, बळीराजा शेतकरी संघटना या संघटना देखील राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, जळगाव येथील चारशे शेतकऱ्यांचा जत्था सचखंड एक्सप्रेसने कालच दिल्ली येथे पोहोचला आहे. या शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था मजनू का टीला गुरूद्वारा, काश्मीरी गेट येथे करण्यात आली आहे.
या आंदोलना संदर्भात माहिती देताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी सांगितले की नवीन शेतकरी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बनवण्यात आले असून यामुळे देशभरातील अन्नदाता शेतकऱी देशोधडीला लागणार आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्यामुळेच जागतिक मंदी तसेच कोरोना यासारख्या जागतिक संकटांनी देखील भारताची अर्थव्यवस्था तरली आहे. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पायावर कुर्हाड मारल्यामुळे देशातील शेतकरी नष्ट होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी, शेती आधारित उद्योग व अर्थव्यवस्थेवरदेखील दुरगामी परिणाम होणार आहे.
या कायद्यामुळे किमान आधारभूत किंमतीची संकल्पनाच नष्ट होत असून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून देखील विस्थापित शेतकऱ्यांची शेती कार्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव खेळला जात आहे.
याशिवाय अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये बदल करून शेतकरी हित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. याचे लेटेस्ट उदाहरण घ्यायचे झाले तर कांदा निर्यातीवरील बंदी ज्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
हे शेतकरी कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडणार नाही, असं राष्ट्रीय किसान मोर्चा नियोजन आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पंजाब, हरियाणा, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातून चारशे शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचला आहे.
दिल्ली येथे या आंदोलनाचे गेल्या तीन महिन्यापासून नियोजन सुरू असल्याचं शंकर दरेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय पातळीवरील श्री शिव कुमार शर्मा, व्ही एम सिंग, योगेंद्र यादव, जगजीत सिंग डल्लेवाल, गुरनाम चंढुनी, बलबीर सिंग राजेवाल, संतवीर सिंग, अभिमन्यू कोहाड, केवी बिजु, लक्ष्मण वंगे यांची समिती कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संपातील किसान क्रांतीचे संदीप गिड्डे आंदोलन समन्वय पाहत आहेत. राष्ट्रीय किसान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नियोजन पाहत आहेत.