मुंबई – अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा मोठा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानाची चादर राज्यावर आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून येते ३ ते ४ दिवस राज्यात विजांचा कडकडाट, गारपीट व जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून बदलले आहे. कोरोना संकटाच्या काळातच अशा प्रकारे वातावरण बदलल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत आहे. त्यातच अरबी समुद्रातील स्थिती तशीच असून दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तपमानात वाढ झाली आहे. आगामी तीन ते चार दिवस राज्यातील हवामान बदललेलेच राहणार आहे. १३ ते १६ डिसेंबर दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, गारपीट व जोरदार पावसाचा इशारा पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.