……
स्वतःला २०-२० क्रिकेटचा “युनिव्हर्स बॉस” म्हणणारा ख्रिस गेल यंदाच्या सिझनमध्ये आज पहिल्यांदाच सामना खेळण्याची शक्यता आहे. गेल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक वादळ आहे. एक असे वादळ जे फलंदाजीला उतरल्यानंतर चेंडू सिमारेषेपार वा-यासारखा सुसाट निघणार, षटकारांच्या विजा कडाडणार आणि मग धावांचा पाऊस पडणार हे नक्की.
मुळचा कॕरेबियन असलेला गेल आयपीएल मध्ये गेली कित्येक वर्ष सातत्याने किंग्ज इलेव्हन पंजाब या संघातून खेळतोय. दरवर्षी लिलावात गेलवर पंजाब संघाची फ्रॕचायझी रग्गड पैसा लावून त्याला विकत घेत असते. यावर्षीही पैसा ओतून गेलला संघात घेतलं खरं, परंतु आयपीएलचे निम्मे सामने खेळून झाले, तरी त्याला अतीम ११ मध्ये स्थान काही मिळाले नाही. यामागचे कथानक देखील मजेशीर आहे. खरेतर गेल सारख्या खेळाडूला कोणता संघ बाहेर बसायला सांगेल बरं ? परंतु, झालं असं की, गेलची ओळख आहे सलामीचा स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून. परंतु के.एल.राहुल आणि मयंक अग्रवाल हे पंजाबचे दोघे सलामीवीर इतके फार्मात आहेत की त्यांना संघातून काढायचं कसं आणि मग गेलला संघात घ्यायचं कसं ? हा यक्षप्रश्न सुरुवातीच्या काही सामन्यात संघ व्यवस्थापना समोर आल्याने गेलला संधी मिळाली नाही. जेव्हा संधी द्यायची वेळ आली तेव्हा नेमका गेल आजारी असल्याने दवाखान्यात अॕडमिट होता.
सध्या के.एल. राहुल सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहे तर मयंक अग्रवाल हा त्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु होतंय असं की या दोघांची वैयक्तिक कामगिरी जरी चांगली होत असली तरी संघाची कामगिरी मात्र काही केल्या चांगली होत नाही. ७ सामन्यात तब्बल पराभव किंग्ज इलेव्हन पंंजाब संघाला झेलावे लागल्याने अखेरीस पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी आता साखळीत जे काही ७ सामने उरले आहेत ते सगळेच्या सगळे जिंकण्याचा पराक्रम आता या संघाला करुन दाखवावा लागणार आहे.
कदाचित ख्रिस गेल सारखा बाहुबली फलंदाज संघात आला तर संघाच्या विजयाचे नशीब बदलेल, याच हेतूने आता ख्रिस गेलला संधी देण्याचा निर्णय किंग्ज इलेव्हन ने घेतला आहे. आज होणाऱ्या राॕयल चॕलेजर्स विरुध्दच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन तर्फे ख्रिस गेल मैदानात खेळतांना दिसेल. हा सीझन हातचा जाऊ पाहत असतानाच किंग्ज इलेव्हन पंजाबने गेलला संघात आणून विरुध्द संघासोबत एक मानसिक खेळी खेळण्याचा डाव रचल्याचे दिसून येते. गेल संघात येईल आणि काहीतरी चमत्कार होईल, उर्वरित सामन्यात किंग्ज इलेव्हन १०० टक्के विजय मिळवेल असे जरी कुणाला वाटत असले, तरी क्रिकेटमध्ये मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कुणालाही भविष्य, भाकीत किंवा अंदाज वर्तविता येत नाही हेच खरं.
एका अवघड मोहिमेवर येण्यापूर्वी गेलचा एक व्हिडिओ पंजाब संघाने सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. त्यात गेल म्हणतो “या खेळाचा युनिव्हर्स बॉस मीच आहे आणि उरलेल्या सात सामन्यात आता आम्हीच विजय मिळवून दाखवणार आहोत”.
भारतात क्रिकेटचे चाहते हे क्रिकेटचे चांगले जाणकार आहेत. गेलच्या या विधानाकडे कसे बघायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ख्रिस गेलची भविष्यवाणी खरी ठरेल की नाही ? हे येणारा काळच निर्णय देवून जाईल. परंतु एक मात्र नक्की आहे की, आयपीएल मध्ये गेल्या काही दिवसात टीव्हीवरची लाईव्ह मॅच बघता बघता मॕच रटाळ होत असल्याने टी.व्ही. बंद करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता किमान गेल खेळपट्टीवर उभा असे पर्यन्त तरी टी.व्ही. समोरुन कुणी उठणार नाही हेच खरं.