मुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.