नवी दिल्ली – आगामी दोन दिवस मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार केंद्रीय जल आयोगाने विविध राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि गुजरात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. माही, नर्मदा, तापी नदीच्या खालच्या भागात आणि दमणगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नर्मदा, तापी, दमणगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आणि पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वलसाड जिल्ह्यातील मधुबन धरणात सध्या ६७ टक्के साठा आहे आणि पावसाच्या अंदाजामुळे त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे आणि दमण केंद्रशासित प्रदेशांसह खालच्या बाजूला असलेल्या सर्व जिल्ह्यांना पूर्वसूचना देऊन धरणातून पाणी सोडण्यात यावे.
पाणलोट क्षेत्रात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने अचानक पाण्याचा लोंढा वाढण्याची शक्यता आहे. याचे मानक संचालन पद्धतीनुसार आणि नियमानुसार संबंधीत सर्व जिल्ह्यांना योग्य वेळेत सूचना देऊन नियमन करावे. सौराष्ट्र आणि कच्छ मधील अनेक लहान धरणे आधीच त्यांच्या जलसाठा क्षमतेच्या जवळ आहेत आणि मुसळधार पावसाचादेखील अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोंकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरातील डोंगररांगांमध्ये पुढील ४-५ दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील दमणगंगा, उल्हास, सावित्री, काळ नद्यांसह तापी आणि ताद्री दरम्यान पश्चिमेला वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेमार्ग व महामार्ग जवळ असलेल्या या नद्यांलगतच्या सखल भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.