सुरेश भाऊराव वाघ
…….
पुर्वीचा पूर्व खान्देश म्हणजे जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा जळगांव. या जिल्ह्यातील बोरी नदीच्या गाठावर वसलेलं माझं टुमदार तामसवाडी गाव. काळ होता १९८७-८८ सालचा. मी इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होतो. गावाबाहेर हायस्कूल होते. हायस्कूलला जातांना-येतांना गावाच्या बाहेर एसटी स्टँड लागायचा. एसटी स्टँडच्या पाठीमागे ‘जैन सायकल मार्ट’ हे सायकलचे दुकान नवीनच सुरू झाले होते.
लहानपणापासून सायकलविषयी मोठे आकर्षण होते. गावात या सायकल दुकानात नवीन रंगीत १० अॅटलस कंपनीच्या बिना कॅरीयरच्या सायकली एका रांगेत लावलेल्या असत. या बिना कॅरीयरच्या सायकलीं ठेवण्याचे कारण जेणेकरून या सायकलींचा वापर डबलसिट कोणी करू नये असा होता. हायस्कूलमध्ये जातांना-येतांना एक दिवस सायकल भाड्याने घेऊन शिकायची असे मनोमनी ठरविले. पण अडचण होती ती वडीलांची. त्यांचा घरात धाक होता. कोणतीही गोष्ट करण्याअगोदर घरातील सर्व जण त्यांना विचारल्याशिवाय करत नव्हते. त्यामुळे सायकल शिकण्यासाठी मला परवानगी देतील हे शक्यच नव्हते.
आमच्या परिवारातील माझा चुलत भाऊ ज्ञानेश्वर आणि मी एकाच वयाचे. शाळेतही आमच्या दोघांचे नाव एकाच दिवशी दाखल केलेले. एके दिवशी त्याच्याजवळ मी सायकल शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानेही लगेच होकार दिला. माझ्याही मनात तेच होते असे सांगितले. मग काय ? एक दिवस आपण दोघेही मिळून सायकल चालवायला शिकू असे निश्चित झाले. भाड्याने सायकल घेण्यासाठी एक महिना लागला आणि मी रुपया जमवला. इयत्ता ७ वीचे वर्ग दुपारी १२ वाजता भरत असत. सकाळी १० वाजता मी व भावाला सोबत घेऊन सायकल दुकानावर गेलो. माझे नाव रजिस्टरमध्ये लिहिले. दुकानाचे मालक गोटू जैन यांनी भाड्याच्या सायकलीचे नियम सांगितले. सायकल पंचर झाली तर त्याचे पैसे वेगळे, तुटफूट झाली त्याची जबाबदारी तुमची, त्यासाठी लागणारे पैसे तुमचे असे पाच मिनिटे माहिती देऊन सायकल ताब्यात दिली. आपण सायकल भाड्याने घेतली हे घरातील कोणी पाहू नये यासाठी गावाबाहेरच्या एका टेकडीवर भावासोबत गेलो.
टेकडीवर गेल्यानंतर पहिल्यांदा सायकल कोणी चालवायची ? यावर आमचा दोघांचा वाद झाला. काही केले तरी पहिल्यांदा मी सायकल चालविणार असा माझा आग्रह होता. त्यानेही नाईलाजास्तव मुक संमती दर्शविली आणि रागानेच मला सायकलीच्या सिटावर बसविले. सायकलला पायडल मारत पुढे जा असा सूचना वजा दमच भरला. सायकलीवर बसून मला सोडून दिले.
सायकल उतारावरून जोरात निघाली आणि समोर पाहतो तर काय गावातील म्हातारी पुताबाई समोरून येत होत्या. पुताबाईला गावात सर्वजण ‘पुत्यामाय’ म्हणत असत. घरोघरी आवाज देऊन भाजी व भाकर मागून पोट भरत असे. गावात पुत्यामायचा मोठा दरारा होता. तिच्या नादी कुणी लागत नसे. शब्दकोषातील सर्वच शिव्या तिला तोंडपाठ होत्या. त्यामुळे तिचे नाव घेण्याची हिम्मत कोणाची होत नव्हती आणि सायकल चालवितांना समोरच पुत्यामाय व तिचे पाळीव कुत्रे एकत्रित येतांना दिसल्याने माझी घाबरगुंडी उडाली. सायकलीला ब्रेक असतो हे पुत्यामायला पाहून विसरलो. हँडलला क्रॉस करून सायकल वळविली आणि त्याच नादात शाळेत जाणार्या एका मुलींच्या अंगावर थेट सायकल गेली.
मी खाली पडलो. ढोपर आणि कोपर फुटले. त्या बिचार्या मुलीलाही मार लागून रक्त वाहत होते. तिच्या मैत्रिणी धावत आल्या आणि मला घेरले. दोन-तीन पट्या मारल्या. परंतु, आपल्याकडून मोठी चुक झाली या पश्चातापाने मी काहीही करू शकत नव्हतो. आमचा भाऊ मात्र टेकडीवर खदाखदा हसत होता. लोकांची गर्दी हळूहळू जमायला सूरूवात झाली. मी हळूच सायकल नदीत नेऊन सायकल धुवून, हातपाय धुवून दहा मिनिटांत सायकल जमा केली.
सायकल जमा करतांना दुकानदार गोटू जैन मात्र अजून तुला सायकल जमा करायला खूप वेळ आहे. अजून तू चक्कर मारून घे. मी मात्र सायकल जमा करण्यावर ठाम होतो. त्यांनाही शंका आली. पण दुकानात गर्दी असल्याने त्यांनी सायकल जमा करून घेतली. पण आता शाळेत कसं जायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. कारण दप्तर घरी घेण्यासाठी जावं लागणार होतं आणि ही गोष्ट जर वडीलांना कळाली तर मला मार मिळणार याची खात्री होती.
सायकल जमा करून मी थेट शाळेत बिनदप्तराचा गेलो. शाळेची प्रार्थना सुरू झाली. माझे काही चित्त लागत नव्हते. त्या मुलीचे वडिल माझ्या नावाचा शोध घेऊन माझ्या घरी आले. लोकांची गर्दी जमा झाली. माझे आजोबा आम्ही त्यांना आदराने ‘बापूजी’ म्हणत असत. त्यांना पाहताक्षणी तक्रार करणारे शांत झाले. कारण, त्यावेळी माझे आजोबा म्हणजे एक प्रतिष्ठित नागरीक म्हणून गावात मानले जात होते. त्यांना पाहून तक्रार करणारे वडिल थोडे मागे सरकले. बापूजींनी त्यांना हात जोडून सांगितले की, ‘माझ्या नातवाने जी चूक केली आहे त्याबद्दल मी माफी मागतो, मुलीला दवाखान्याचा जो खर्च येईल तो मी करतो. कारण ती तुमची मुलगी असली तरी माझी पण नात आहे.’ गावात लोकांची एवढी गर्दी व बापूजी माफी मागत असल्याचे वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला.
या सर्व गोष्टी घडत असतांना भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याच्या मनात माझ्याविषयी राग होता. कारण त्याला सायकल चालवायला मिळाली नव्हती. वडीलांनी सर्व ऐकून घेतले आणि काही एक न विचारता भावाला मारायला सुरूवात केली. कारण वडीलांचा गैरसमज असा झाला की, उपस्थित असलेला भाऊ यानेच ती सायकलची धडक दिली आहे, म्हणून तो उपस्थित आहे. भाऊ मात्र मार खाऊन शाळेत आला. माझ्याशी न बोलता रागाने माझ्याकडे पाहत होता. शाळेची मधली सुट्टी झाली आणि त्याने मला मारले.
झालेल्या घटनेनंतर मात्र सायकलीला हात लावायचा नाही असा निश्चय केला. पण काही दिवस गेल्यानंतर कोणी पाहुणे घरी आले तर त्यांच्या सायकलचे स्टँड काढणे, सायकल बाजूला नेणे असे सुरू केले. मग पुढे सायकलीला हळूच हाफ पायडल मारणे. मग दांडीवरून चालविणे, नंतर फूल पायडल मारून एकदाची सायकल शिकलो. त्यानंतर सिंगल, डबल, हात सोडून, करियरवर बसून सायकल चालविण्याचा पराक्रम केला. पण जीवनाची सायकल अजूनही अविरत चालू आहे.
सुरेश तुझ्या ओघवत्या लेखन शैलीने गतकाळ डोळ्यासमोर चित्ररूपाने उभा करून आम्हा वाचकासही भूतकाळात डोकावण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली. थोडया फार फरकाने आम्ही सायकल कसे शिकलो गतस्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा.