भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज दि. १५ ऑक्टोबर रोजी जन्मदिन असून हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो यानिमित्त लेख…
- मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
आजच्या पिढीला किंवा अखिल भारत वर्षातील मानव जातीला वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या जवळ फक्त दोन बॅगा भरून त्यांची पुस्तके होती, बाकी सर्व मौल्यवान भेट वस्तू त्यांनी राष्ट्रपती भवनातच ठेवल्या होत्या. डॉ.कलाम यांच्याकडे सुमारे 20 हजार ग्रंथसंपदा होती, हीच त्यांची संपत्ती होती. आजच्या काळात ग्रंथालयाप्रमाणेच ई बुक आणि ऑडिओ बुक सारख्या पुस्तकांची मागणी वाढत आहे.
भारतात वाचनसंस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे. सन पूर्व चौथ्या शतकात नालंदा तक्षशीला सारख्या विद्यापीठांमध्ये भव्य अशा तीन, चार इमारतीत मध्ये ग्रंथालये असत. या ग्रंथालयात परदेशातील अभ्यासक अनेक वर्ष अभ्यास करीत असत. तसेच स्वंतत्र्य पूर्व काळात देखील आपले भारतीय उच्च शिक्षणासाठी पाश्चात्य देशात जात असताना तेथे देखील ग्रंथालयामध्ये तासन्तास वाचन करीत असत. काही वर्षापूर्वी खेडयापाडयात पोथ्या, पुराणे यांचे वाचन होत असे , आता त्याची जागा टिव्ही आणि मोबाईल यांनी घेतली आहे. वाचन संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
वाचन, लेखन, मनन, चिंतन यासाठी ई-बुक , फेसबुक, इंटरनेट अशी समृद्ध वाचनाची दालने सध्याच्या अत्याधुनिक काळात उपलब्ध आहेत, वाचाल तर वाचाल अशी म्हण आबाल वृद्धांसाठी लागू आहे, म्हटले जाते. आजच्या संगणक ,लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही मधील कार्टून मालिकाच्या जमान्यात मुलांवर संस्कार कसे होतील ? अशी पालकांना चिंता आहे, मुख्य म्हणजे त्यासाठी पातकांचीच वाचनसंस्कृती वाढण्याची गरज आहे. आणि काही प्रमाणात ती वाढत आहे, असे दिसून येते . कारण कोरोनाच्या संकट काळात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सर्व वाचनालय बंद होती. परंतु अनेक लोक ई बुक, ऑडीओ बुक मोठया प्रमाणात वाचत होते. त्यामुळे आता लेखक , प्रकाशक आणि संबंधित संस्थांचे काम वाढले आहे .वाचन प्रेरणा दिनानिमित्त आजपासून सर्व वाचनालय आणि ग्रंथालय खुली करण्यात आली आहेत . गेल्या दोन-तीन वर्षांचा विचार केल्यास पुस्तकांच्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे . तसेच वाचनालय देखील अनेक दर्जेदार उपलब्ध आहेत. आता ई-बुक आणि ऑडिओ बुक माध्यमातील पुस्तकांची मागणी वाढली आहे. ही निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)