नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या कक्षाला आज दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापलिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून सदर तात्काळ घटनेची माहिती घेतली. तसेच या घटनेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापलिका आयुक्तांना केल्या.
आज दुपारच्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना दुरध्वनीद्वारे संपर्क करत घटनेची माहिती घेतली. यावेळी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक माहिती असून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एक तासाच्या आत ही आग विझवली असून आगेवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिली. त्यानंतर या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.