नााशिक – वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी अगोदर संघटनात्मक बदल करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यात पहिला बदल शिवसेना महानगरप्रमुख या पदाचा केला आहे. या पदावर सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे. दोन वर्षापूर्वी या पदावर दोन महानगरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात महेश बडवे यांच्याकडे पंचवटी, नाशिक पश्चिम, सिडको विभाग तर सचिन मराठे यांच्याकडे नाशिकरोड, पूर्व व सातपूर हा विभाग दिला होता. पण, या दोघांची उचलबांगडी करुन आता या पदावर बडगुजर यांची एकमेव निवड केली आहे. त्यांच्याकडे आता संपूर्ण महानगरचा पदभार असणार आहे.
दोन दिवसापूर्वी संपर्क नेते खासदार संजय राऊत नाशिकला आले होते. त्यावेळेस त्यांनी या बदलाचे संकेत दिले होते. अखेर संघटनात्मक बदल झाला आहे. या बदलानंतर अजूनही आणखी संघटनात्मक बदल केले जाणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान पदाधिका-यांचे धाबे दणाणले आहे.
महापौर बनवण्याची रणनिती
शिवसेनेने मुंबई व नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे चंग बांधला आहे. त्यासाठी महाआघाडीतर्फे ही निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे तीन पक्षाच्या या आघाडीत आता शिवसेनेबरोबर, राष्ट्रवादी व काँग्रेस असणार आहे. त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून या आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला जास्त जागा आघाडी झाली तर येणार आहे.
भाजपाशी थेट सामना, मनसेचे आव्हान
महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांचा थेट सामना हा भाजपबरोबर असणार आहे. तर मनसेचे आव्हान सुध्दा असणार आहे.