नवी दिल्ली – देशभरात तापमानाचा पारा चढत असून, एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. गेल्या चार पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात विशेषतः राजस्थानमध्ये तापमान ४० अंशापेक्षा वर गेलं होतं. आगामी तीन महिन्यात उत्तर, वायव्य भारतातील बहुतेक भाग आणि पूर्व भारतातील काही भागात तापमान अधिक राहण्याची चिन्हे आहेत. दक्षिण भारताचा बहुतेक भाग, ईशान्य भागातही तापमानाचा पार चढाच राहण्याची चिन्हे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
तापमानात वाढ का
राजधानी दिल्लीत सोमवारी तापमान ४० अंशावर पोहोचल्यानं उष्ण वारे वाहिले. गेल्या ७६ वर्षांतील मार्चचा हा सर्वात जास्त गरम दिवस होता. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्र म्हणाले, गुजरातपासून हरियाणापर्यंतच्या क्षेत्रात वातावरणातील दबाव भिन्न होते. तसेच राजस्थानातील उष्णता स्थानांतरित झाली. पाकिस्तानातूनसुद्धा उष्णता स्थानांतरित झाली आहे. या काळात पाकिस्तानच्या हवामान केंद्रानं ४५ अंश तापमानाची नोंद केली आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ नरेश कुमार यांनी दिली. पश्चिम भागातून आलेल्या उष्ण हवेमुळे तापमानात वाढ झाल्याचं ते म्हणाले.
धुळीचे वादळ
हवामान विभागानुसार एक एप्रिलपर्यंत राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तर मध्य प्रदेश, झारखंड, बंगामध्ये धूळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस
अग्नेय भागात बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, अंदमान निकोबार बेटांवर दोन एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन महिने परीक्षेचे
या वर्षी कडक उन्हाळा असून उष्णतेचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता आहे. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर भारत, वायव्य भारताचा बहुतांश भाग तसेच मध्य भारतातील काही भागात भीषण उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणाचा अंदाज पाहता पुढील तीन महिने परीक्षेचेच राहणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.