नाशिक – जमिनीची कागदपत्रे तयार करुन देण्याच्या मोबदल्यात तब्बल सव्वा लाखाची मागणी करणाऱ्या आगरटाकळी येथील तलाठी किशोर संजयकुमार घोळवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) यासंदर्भात कारवाई केली आहे.
आगरटाकळी, खोडदेनगर, उपनगर येथील जमिनीचे स्वतंत्र सनद, ७-१२ उतारा, ६ ड कागदपत्रांसाठी तलाठी घोळवे याने संबंधितांकडे तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. यासंदर्भात एसीबीने सापळा रचला. एसीबीच्या पथक आणि पंचांच्या समक्ष तलाठी घोळवे याने ५० हजार आणि ७५ हजार रुपयांची मागणी करताना स्पष्ट झाले. लाच देणे आणि घेणे गुन्हा असल्याने याप्रकरणी तलाठी किशोर घोळवे याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एसीबीकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे किंवा घेणे यासंदर्भात काही तक्रार करायची असल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.