अहमदाबाद – स्त्री-पुरुषाच्या शारिरीक संबंधातून मूल जन्माला येतं. ही आहे मानवी जीवनातील नैसर्गिक प्रक्रिया. परंतु एखाद्या बाळाला जन्म देण्यासाठी आई आणि वडील एकच व्यक्ती असेल तर? गुजरातमधल्या डॉ. जेसनूर दायरा या आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावणार आहेत. त्यांनी स्वतःचं वीर्य (सीमन) फ्रीज केलं आहे. लिंग बदल करून डॉ. दायरा यांचा गर्भधारणा करायचा विचार असून, तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे.
डॉ. जेसनूर दायरा यांचा जन्म गुजरातमधल्या गोध्रामध्ये झाला आहे. डॉ. दायरा यांनी नुकतीच रशियातल्या विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्या ट्रान्सवूमन आहेत. म्हणजे त्यांचा जन्म पुरुष म्हणून झाला, पण त्या स्वतःला महिला मानतात. लहानपणीच त्यांना या गोष्टीची जाणीव झाली होती. परंतु कुटुंबीयांना त्रास होईल म्हणून त्यांनी शांत राहणं पसंत केलं.
त्या लवकरच लिंगबदल शस्त्रक्रिया करणार आहेत. त्याआधी त्यांनी वीर्य फ्रीज करून ठेवले आहेत. नंतर या वीर्याच्या माध्यमातून त्यांचा आई होण्याचा विचार आहे. रशियात असताना त्यांनी हे सत्य सांगण्याचं धाडस केलं. मी स्वतःमधलं खरं रूप ओळखलं आणि एका महिलेप्रमाणे राहण्याचं धाडस केलं. ही गोष्ट स्वतंत्र होण्यासारखी आहे, असं डॉ. दायरा यांनी सांगितलं. आता न थांबता त्यांना स्वतःच्या अटींप्रमाणे जगायचं आहे. यासाठी त्यांना कुटुंब आणि समाजातून पाठिंबा मिळत आहे.
या वर्षाच्या अखेर दायरा लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला होणार आहे. सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला येईल. जैविकदृष्ट्या हे मूल त्यांचं असेल, कारण वडील म्हणून त्यांच्या वीर्यातून बाळ जन्माला येईल. त्यानंतर त्या त्याचा सांभाळ करतील.