दिंडोरी – स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असतांना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेले चिंतनाच्या आधारावर आपल्या बुद्धीचा वापर हा व्यक्तीला चांगली दिशा मिळवून देतो. लॉकडाऊनच्या काळात सध्या शाळा बंद आहे पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी भरपूर वेळ मिळत असून या वेळेचा उपयोग करून काही विद्यार्थी भविष्याचा वेध घेत आहेत. आंबे वरखेडा येथील कृष्णा राजेश वडजे आणि आणि शिवम रज्ञानेश्वर वडजे यांनी चक्क इलेक्ट्रिकवरील सायकल तयार केली आहे.
आंबे वरखेडा येथील कृष्णा राजेश वडजे (इयत्ता १० वी) व शिवम ज्ञानेश्वर वडजे (इयत्ता ६ वी) या दोन्ही बंधूनी एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग करत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करतन इलेक्ट्रीक वर चालणारी सायकल तयार केली आहे. यासाठी त्यांना केवळ तीन हजार रुपये खर्च आला आहे. हे दोन्ही विद्यार्थी रा. स. वाघ संस्थेच्या कादवा इंग्लिश स्कूल, राजरामनगर येथे शिक्षण घेत आहे.
कृष्णा वडजे याने इयत्ता ८ वी ला असतांना ब्लोअर तयार केले होते. चार्जिंगवर स्कुटर चालते याची प्रेरणा घेऊन आम्ही विचार केला.इलेक्ट्रिकवर चार्जिंग करून सायकल चालू शकतो का? बाजारात चार्जिंगवर चालणारी सायकल उपलब्ध आहेत .पण सर्वसामान्य लोकांना ती सायकल घेणे आर्थिक दृष्टया शक्य नाही.म्हणून टाकाऊ पासून टिकाऊ कमीत कमी खर्चात चार्जिंग ची सायकल तयार करण्याचा आम्ही निश्चय केला. सायकलला चार्जिंग बॅटरी बसविण्यासाठी एकूण तीन हजार रुपये खर्च आला.
यासाठी लागणाऱ्या १२volt व २५० वॅट मोटर, १२ volt बॅटरी, एमसीबी स्विच, १.५ नंबर वायर, बाईकच्या इंजिनचे स्पोकेट घेतले. व इंजिन मधील टायमिंग चैन घेतली. मोटरी चे माप घेत सायकल ला मोटर बसविण्यासाठी लोखंडाची पट्टी बसवून त्या पट्टीला होल पाडले व सायकल च्या पुढच्या चाकाला वेल्डिंग केली.आणि तिथे मोटार बसविली.आणि स्पॉकेट चाकाला जोडले.व टायमिंग चैन मापानुसार कमी करून मोटर बसविली.व नंतर बॅटरी ठेवण्यासाठी स्टँड तयार करून त्यास फिट केली.एमसीबी स्विच ब्रेक जवळ जॉईन केला व वायर बॅटरी ला जॉईन केली. अशा पद्धतीने सर्व जोडणी केली व बॅटरी चार्ज करून ३० मिनिटात ५ किमी अंतर सायकल बॅटरीवर चालत आहे.
शाळेतील शिक्षणाचा योग्य उपयोग करत या दोन्ही वडजे बंधूनी शालेय वयातच एक चांगला प्रयोग करत भविष्यातील शास्त्रज्ञ होण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. या प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन उत्तम भालेराव सर्व संचालक व परिसरातून कौतुक केले जात आहे