नवी दिल्ली/हैदराबाद – आंध्र प्रदेशात एका रहस्यमय आजारामुळे खळबळ उडाली असून राज्यभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एलुरू शहरात पसरलेल्या या आजाराने आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सुमारे ३५० जण आजारी आहेत. या आजाराचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक राज्य दौर्यावर येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आंध्र प्रदेशात जाणाऱ्या या पथकात एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जमशेद नायर, एनआयव्ही पुणे येथील विषाणू तज्ज्ञ डॉ. अविनाश देसोतवार आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. कुलकर्णी यांचा समावेश आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एलुरू येथे अचानक उद्भवलेल्या या आजाराची माहिती ही टीम घेणार आहे. सदर पथक लगेचच आपला प्राथमिक अहवाल सादर करेल.
केंद्राकडून मदतीचे आश्वासन
केंद्रीय गृह राज्यमंत्री डॉ किशन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिवांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी सोमवारी (७ डिसेंबर) इलुरु येथे गेले होते. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ए. कृष्णा श्रीनिवास यांच्या मते, परिस्थिती नियंत्रणात आहे. चक्कर आणि अपस्मार अशी लक्षणे आढळून आल्यानंतर लोकांना रुग्णालयात आणले असल्याचे त्याने सांगितले.
घरोघरी सर्वेक्षण
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या आजाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रक्त चाचण्या आणि रुग्णांच्या सीटी स्कॅनचे अहवाल सामान्य आहेत. पाठीचा कणा मधील द्रवपदार्थ चाचणी देखील सामान्य आहे. पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला गेला होता, मात्र तो प्रदूषित नाही. सर्व पीडितांची कोरोना तपासणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
अचानक बेशुद्ध
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, काही आजारी लोक अचानक बेशुद्ध झाले आणि त्यांच्या तोंडातून फेस येताच शरीर थरथर कापू लागले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याची चौकशी केली, ज्याचे अहवाल सामान्य आहेत. परंतु सदर रुग्ण केवळ एलूरू शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण आणि त्यालगतच्या डेंदुलुरू भागातही आढळले आहेत.