मुंबई – आंदोलनजीवी अशा पध्दतीने शेतकऱ्यांना हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
आज जनता दरबार उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली. आंदोलने ही देशभर नव्हे तर जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं, कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बसणे इत्यादी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने त्यांनी केली. सभागृहातसुद्धाआंदोलने केली याची आठवण देखील छगन भुजबळ यांनी सांगितली. लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.