नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी हे आदेश ३० नोव्हेंबरपर्यंत होते. मात्र, युरोपसह अनेक देशातील कोरोनाची दुसरी लाट आणि भारतात येऊ घातलेली दुसरी लाट हे पाहता आंतरराष्ट्रीय विमाने बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कोरोना लॉकडाऊन मधून विविध बाबींना सूट मिळते आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमानसेवाही वेग घेईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र, सरकारने कुठलाही धोका पत्करण्याचे निश्चित केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर अखेरीस पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.