नाशिक – ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांच्या ‘सुखांत जीवनाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे.
अॅड. अविनाश भिडे हे जिल्हा न्यायालयात ख्यातनाम वकील असून, त्यांचा वेगळा दबदबा आहे. प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी एका वेगळ्या विषयावर पुस्तक लिहिले आहे. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा व सत्र न्यायाधीश वघवसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. महेश करंदीकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, रुग्ण मित्र प्रसाद अग्निहोत्री, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अॅड. सतीश देशमुख, बीसीएमजीचे अध्यक्ष अॅड. सुभाष घाटगे आदी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुस्तकाच्या प्रकाशक सौ. आदिती भिडे यांनी दिली आहे.
या पुस्तकाविषयी बोलताना लेखक अॅड. अविनाश जनार्दन भिडे म्हणाले की, आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या रुग्णांकरिता आणि त्यांच्या नातेवाईकांकरिता उपयुक्त अशी अर्थपूर्ण माहिती या पुस्तिकेत आहे. प्रगत वैद्यकशास्त्रामुळे व्याधीमुक्त होण्याचे प्रयत्न व मृत्यू टाळण्याचा प्रयत्न यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबत फारसे समाजप्रबोधन नाही. शरीराचा नाश कधी ना कधी निश्चित आहे. आनंदाचे माध्यम असलेल्या शरीराच्या शेवटच्या काळात त्याला कमीत कमी यातना कशा होतील हे प्रत्येकाने बघणे आवश्यक आहे. स्वतःचे वैद्यकीय उपचाराबाबतचे इच्छापत्र/लिव्हिंग विल का व कसे असावे, जेणेकरून आयुष्याचा अंतिम टप्पा सुकर होईल. या बाबतचे विवेचन या पुस्तिकेत केले आहे. संपन्न आयुष्य जगलेल्या किंवा न जगलेल्या व्यक्तीला मरण मात्र सन्मानपूर्वक कमीत कमी दु:खदायक यावे व त्याबाबतच्या तरतुदींचे त्यांना आकलन व्हावे यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असे भिडे यांनी सांगितले आहे.